Video: पोलिस अन्‌ हमालाच्या चाणाक्ष नजरेमुळे पुण्यात हरवलेला जुबेर सापडला!

Zuber
Zuber

पुणे : पश्‍चिम बंगालमधील कोलकत्याचा अवघा 13 वर्षांचा जुबेर शिक्षणासाठी पुण्यात मामाकडे आला. एक दिवस मामासोबत दुकानाला गेलेला जुबेर अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे मामासह त्याचे कुटुंबीयही हवालदिल झाले. पोलिस ठाण्यात तक्रार दिली, शहरभर त्याचे छायाचित्र आणि माहिती असलेले पोस्टरही लावले. पण जुबेरचा पत्ता लागेना.

दरम्यान, एका पोलिसाने रेल्वे स्थानकात लावलेल्या पोस्टरवरील तो मुलगा आपल्या येथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसाने तत्काळ त्या मुलाचा शोध घेतला आणि त्या मुलाच्या मामाशी संपर्क साधला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आठवड्यानंतर हरवलेला जुबेर पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबात गेला!

जुबेर ताहीर शेख मुळचा कोलकत्ता येथील राहणारा. घरची परिस्थती हालाखीची असल्याने शिक्षणासाठी पुण्यातील त्याच्या रोशन नुरहसन शेख नावाच्या मामाकडे आला. बालाजीनगर येथील गुलमोहर अपार्टमेंटमध्ये तो मामाच्या घरी राहात होता. मामाकडे काही दिवसातच तो चांगला रुळला. 16 जानेवारीला मामासमवेत दुकानामध्ये गेला. त्यानंतर मामाला काहीही न सांगता निघून गेला. तेथून तो बसने पुणे स्टेशन येथे आला. पुण्याची माहिती नसल्याने तो रेल्वेमध्ये बसून खडकी रेल्वे स्थानकावर उतरला. त्यानंतर तेथून बाहेर पडून खडकी रेल्वे स्थानकाजवळीलच एका स्टॉलवर काम करू लागला.

दरम्यान, इकडे घाबरलेल्या मामाने भाचा हरवल्याची घटना त्याच्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात जुबेर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. केवळ तेवढ्यावरच न थांबता त्यांनी जुबरचे छायाचित्र आणि त्याच्याबद्दलची माहिती असलेले पोस्टर शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानक, गर्दीची ठिकाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी लावली. त्यामध्ये काही दिवस निघून गेले.वतरीही जुबेरचे मामा पोलिसांकडे दररोज पाठपुरावा करीत होते.

दरम्यान, पुणे रेल्वेस्थानकावर लावलेले पोस्टर हमाल आकाश वायदंडे आणि खडकी लोहमार्ग पोलिस मिलिंद लोणारे यांनी पाहिले. पोस्टरमधील मुलगा खडकी रेल्वे स्थानकाजवळील एका स्टॉलवर काम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध घेऊन दत्तवाडी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जुबेरचा मामा रोशन शेख यांना कळवून जुबेरला त्यांच्याकडे सुपुर्द केले.

"जुबेरच्या मामाचे दत्तवाडीमध्ये दुकान आहे. जुबेर एक दिवशी त्यांना काहीही न सांगता निघून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु ठेवले होते. दरम्यान खडकी लोहमार्ग पोलिसांना तो आढळून आला. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जुबेरला त्याच्या मामाच्या ताब्यात देण्यात आले आहे.''
- राजीव पवार, पोलिस उपनिरीक्षक, दत्तवाडी पोलिस ठाणे.

"जुबेर यापुर्वीही काहीही न सांगता निघून गेला होता. दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यास पुण्यात ठेवणे योग्य नाही. त्यास लवकरच त्याच्या आई-वडिलांकडे पाठविण्यात येईल.''
- रोशन शेख, जुबेरचे मामा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com