जागा खरेदी करणे आता सोपे होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणारे गैरप्रकार आणि फसवणूक टाळण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा आणि गाव नकाशे एकमेकांशी लिंक केले आहेत. त्यामुळे जमिनीची सर्व माहिती घरबसल्या समजण्यास मदत होणार आहे.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी आणि ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक

सातबारा उतारा आणि गाव नकाशा जोडले एकमेकांशी
पुणे - जागा खरेदी करताय, ती कुठे आहे, तिच्या चतुःसीमा काय आहेत, आजूबाजूचे गट नंबर आणि मालक कोण आहेत, दाखविली तीच जागा प्रत्यक्षात खरेदीखत करून ताब्यात मिळणार आहे का, असे अनेक प्रश्‍न तुमच्या मनात उभे राहतात. त्यांची शंभर टक्के उत्तरे मिळतील, असे नाही. परिणामी, अनेकदा जागा दाखविली एक आणि खरेदी केल्यानंतर ती असते भलतीकडेच. मग फसवणूक झाल्याचे लक्षात येते. आता अशी फसवणूक होणे टळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी लिंक केला आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी आणि दस्तनोंदणी करण्यापूर्वी ही सर्व माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. यापूर्वी गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्‍यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांश-रेखांशासह (जीपीएस) सर्व माहिती तुम्हाला सहजरीत्या उपलब्ध होणे शक्‍य झाले आहे.

'राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा' 

एवढेच नाही तर ज्या सर्व्हे नंबर अथवा गट नंबरमधील जमीन तुम्ही खरेदी करीत आहात, त्या सर्व्हे नंबरचे एकूण क्षेत्र, त्यात असलेले पोटहिस्से, त्यांचे मालक यांचीदेखील माहिती मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने गाव नकाशे पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची निःशुल्क प्रिंट काढून दस्त खरेदीला देखील जोडता येणार आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी करणे आता अधिक सोपे होणार आहे. जमिनींच्या खरेदी-व्रिकी व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीला देखील यामुळे आळा बसणार आहे.

पुणे : सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक; अंगावरुन ट्रक गेल्याने तरुणाचा मृत्यू

लवकरच काम पूर्ण
राज्यात एकूण ४४ हजार गावे आहेत. त्यापैकी ३७ हजार गावांतील गाव नकाशे सातबारा उताऱ्याशी लिंक करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात १९१० गावे आहेत. त्यापैकी केवळ १३५ गावांचे गाव नकाशे लिंक करण्याचे काम राहिले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच उर्वरित सर्वच गावांतील गाव नकाशे लिंक करण्याचे काम पूर्ण होईल. भूमी अभिलेख विभागाच्या https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buying space will be easier now