लोहगाव विमानतळावर कार्गो सेवेला देणार जास्तीत जास्त प्राधान्य - गिरीश बापट

Cargo-Sertvice
Cargo-Sertvice

पुणे - ‘लोहगाव विमानतळावर कार्गोचे विस्तारीकरण करून जास्तीत जास्त मालवाहतूक पुण्यातून विमानाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हवाई दलाकडून अडीच एकराचा भूखंड मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. या पुढील काळात कार्गो सेवेच्या विस्ताराला प्राधान्य असेल अन् त्यासाठी दिल्लीतही पाठपुरावा करणार आहे,’ असे स्पष्टीकरण खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी येथे केले. तसेच, विमानतळाच्या विस्तारीकरणाचे कामही ४७ टक्के पूर्ण झाले असून, दोन वर्षांत ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानतळ सल्लागार समितीची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर झालेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग उपस्थित होते. विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी, विमानतळ व कार्गो सेवेचे विस्तारीकरण, भूसंपादन, पार्किंग लॉटचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा झाली. 

बापट म्हणाले, ‘विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेळेत म्हणजे जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होईल. तसेच पार्किंग लॉटचे बांधकामही २०२२ पूर्वीच पूर्ण होणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासाठी खासगी भूखंड संपादित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येईल. कार्गोची क्षमता वाढावी, अशी उद्योगांची मागणी आहे. त्यासाठीचा भूखंड ताब्यात आल्यावर १५० टनांची कार्गोची वाहतूक ५०० टनांपेक्षा जास्त होऊ शकते. सातारा, नगर, सांगली, कोल्हापूरवरूनही पुण्यात माल येऊन कार्गोद्वारे तो जगभर जाऊ शकतो. त्यामुळे कार्गोवर लक्ष केंद्रित केले आहे.’’

पुण्यातून विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी पुरेशा सुविधा देण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे. हवाई दलाकडून साडेआठ एकर आणि अडीच एकराचा भूखंड विमानतळ प्रशासनाच्या ताब्यात मिळावा, यासाठी मुख्यालयाशी संपर्क साधला आहे.

दिल्लीत त्यासाठी बैठक घेणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. खासदार चव्हाण यांनी गर्दीच्या वेळात विमानतळ परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका, पोलिसांनी तातडीने आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. धावपट्टी विस्तारीकरणासाठी खासगी भूखंडाचे संपादन करण्यासाठी जागा मालक आणि महापालिकेतील प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार टिंगरे यांनी नमूद केले.

सल्लागार समितीवर नवे सदस्य 
विमानतळ सल्लागार समितीवर पाच नव्या सदस्यांची नियुक्ती झाल्याचे खासदार बापट यांनी बैठकीत जाहीर केले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष सुधीर मेहता, ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, बादशहा सय्यद आणि उज्ज्वल केसकर यांचा त्यात सहभाग आहे. समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतही त्यांनी सहभाग घेतला. 

असे होणार बदल

  • विमानतळावरील प्री-पेड रिक्षा थांब्याची मुदत ७ मार्चपर्यंत वाढविली आहे. विमानतळ प्राधिकरणाने परवानगी दिल्यास रिक्षाथांबा विमानतळाच्या आवारात ठेवणार आहे.
  • शिवाजीनगर ते विमानतळ दरम्यान ‘सिग्नल फ्री कॉरिडॉर’ करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांना आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
  • विमानतळाच्या आवारातून पाच मार्गांवर पीएमपीची बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • महापालिका, राज्य सरकार यांच्याकडील विमानतळाच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी स्वतंत्र बैठक होणार.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com