esakal | SSC Result : सीबीएसई दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाचे अपडेट

बोलून बातमी शोधा

SSC Result : सीबीएसई दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाचे अपडेट
  • वर्षभर शाळांमध्ये झालेल्या ‘टेस्ट’द्वारे होणार अंतर्गत मूल्यांकन

  • दहावीच्या निकालाचे निकष जाहीर

  • शाळांचा निकाल कमी होण्याची चिन्हे

SSC Result : सीबीएसई दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाचे अपडेट
sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंळडाने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता त्याचे निकाल जाहीर करण्यासंदर्भातील निकष जाहीर केले आहेत. दहावीचा निकाल १०० गुणांवर आधारित असतो, त्यातील २० गुण हे अंतर्गत गुण असतात, ते दरवर्षीप्रमाणेच दिले जातात. उर्वरित ८० गुणांसाठी बोर्डाची परीक्षा होते. परंतु, यंदा हे गुण शाळामार्फत वर्षभर घेतलेल्या टेस्ट, सराव परीक्षा (प्रिलियम) या आधारे दिले जाणार आहेत. यानुसार दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मे महिन्यात पूर्ण केल्यानंतर २० जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याची तयारी केली जाणार आहे. सीबीएसईच्या धोरणानुसार ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुणांचे अंतर्गत मुल्यमापन याआधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होतो. यंदाही विद्यार्थ्यांचा निकाल १०० गुणांच्या आधारेच असेल. प्रचलित नियमांनुसार २० गुणांचे मूल्यांकन होईल. बोर्डाची परीक्षा रद्द केल्याने उर्वरित ८० गुणांचे मुल्यांकन शाळांनाच करायचे आहे. त्यासाठी वर्षभर घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून हे मूल्यांकन होईल. हे मूल्यांकन पूर्ण करून शाळांना ११ जूनपर्यंत सर्व माहिती मंडळासमोर सादर करावी लागणार आहे, असे ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: पुण्यात पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे वाचले आठ जीव

‘सीबीएसई’च्या दहावीचे अंतर्गत मुल्यांकनाचे वैशिष्ट्य :

- शाळेत वर्षभर झालेल्या विविध चाचणी परीक्षांच्या (टेस्ट) आधारे होणार मुल्यांकन

- मूल्यांकनासाठी प्रत्येक शाळेत असणार समिती

- शाळेच्या निकालावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील तीन वर्षांच्या निकालाची सरासरी पाहिली जाणार

- एखाद्या विद्यार्थ्यांला शाळेने वर्षभर घेतलेल्या परीक्षा देणे शक्य न झाल्यास त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून टेलिफोनिक मुल्यांकन करावे.

- गुणांची पुनर्पडताळणी, छायांकित प्रती, पुर्नमूल्यांकन हे धोरण यंदाच्या परीक्षेसाठी लागू होणार नाही.

अशी असेल निकालासाठीची मूल्यांकन समिती

- समितीत सात शिक्षक असतील

- शाळेतील गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि दोन भाषा विषयांचे असे पाच शिक्षक

- आणि अन्य (बाहेरील) शाळेतील दोन शिक्षक

असे होणार बोर्डाच्या परीक्षेतील ८० गुणांचे विभाजन

- चाचणी परीक्षा : १० गुण

- सहामाही परीक्षा : ३० गुण

- सराव परीक्षा : ४० गुण

हेही वाचा: येत्या आठ दिवसांत रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील : वळसे पाटील

शाळांचा निकाल कमी लागण्याची शक्यता

‘‘वर्षभर घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षांचे गुण बोर्डाच्या निकालासाठी ग्राह्य धरले जातील, हे विद्यार्थ्यांना माहित नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षा तितक्या गांभीर्याने दिलेल्या असतीलच असे नाही. तसेच, सराव परीक्षांद्वारे विद्यार्थी प्रथम संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा देत असतात, त्यामुळे त्यात त्यांना कमी गुण मिळाले, तरी मुख्य बोर्डाच्या परीक्षेत अधिक गुण मिळविण्याची त्याची तयारी झालेली असते. परंतु केवळ अंतर्गत मूल्यांकनावर निकाल दिला जाणार आहेत. त्यामुळे कदाचित त्यावर आधारित हा निकाल असल्याने तो कमी लागण्याची शक्यता आहे.’’

- मिलिंद नाईक, मुख्याध्यापक, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला