esakal | येत्या आठ दिवसांत रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील : वळसे पाटील

बोलून बातमी शोधा

dilip valse patil
येत्या आठ दिवसांत रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील : वळसे पाटील
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णाना तातडीचे उपचार मिळण्यासाठी जर्मनीहून विमानाने १४ उच्चप्रतीचे व्हेंटिलेटर मागविण्यात आले आहेत. 1 कोटी 24 लाख रुपये किमतीचा लिक्विड ऑक्सिजन टँक ही बसविला जाईल. कार्डिअॅक रुग्णवाहिका ही उपलब्ध होईल. मी केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर दोन तासात माणुसकीचा धर्म पाळण्याचे काम पतसंस्था, ट्रस्ट व दानशुरांनी केले. याचा मला आंबेगाव तालुक्यातील भूमी पुत्रांचा सार्थ अभिमान आहे. येत्या आठ दिवसांत रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. 2) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांनी कोरोना संसर्ग झालेली रुग्ण संख्या उपाययोजना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

वळसे पाटील म्हणाले, “रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यासठी राज्य सरकार सहा हजार 500 कोटी रुपये निधी खर्च करणार आहे. कार्यकर्त्यांनी लसीकरणासाठी जन जागृती करावी. कोरोनाची साथ वर्षभर टिकून राहण्याची शक्यता आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. विशेषता मंचर, शिनोली, घोडेगाव, अवसरी खुर्द, निरगुडसर या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात. आढळराव पाटील म्हणाले, “खाजगी हॉस्पिटल मध्ये वाढीव बील लावली जातात. त्यासाठी प्रशासनाने बिलाची तपासणी करून रुग्णांना न्याय द्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड उपचार केंद्र सुरु करावीत.

शहा म्हणाले, ''साईनाथ, कुलस्वामिनी, पराग, राम पतसंस्था, पराग मिल्क, कमलराज असोसिएटस, कमलेश शिंदे, मोहन थोरात, सावता वाघमारे यांनी प्रत्येकी 1, भरत भोर 2, हर्शल मोरडे 3, व्हेंटिलेटर, देवेंद्र शहा फोऊडेशन तर्फे कार्डिअॅक रुग्णवाहिका, जानकी बजाज ट्रस्ट तर्फे लिक्विड ऑक्सिजन टँक उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त लोक सहभागातून १० लाख रुपये जमा झालेल्या रकमेतून अतिरिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार व अन्य साधनसामग्री खरेदी करता येणार आहे. अजूनही दानशूरांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या बँक खात्यामध्ये देणगी स्वरूपात रक्कम जमा करावी.” डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना बाधित रुग्णाच्या घरावर स्टीकर लावणे, फवारणी करणे आवश्यक आहे. संकट परतून लावण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा.” आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात कामगार तलाठी व ग्रामसेवक फिरकत नसल्याची तक्रार आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती संजय गवारी व नंदकुमार सोनवले यांनी केली. या तक्रारीची दखल घेत आयुष प्रसाद म्हणाले, “पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व महसूलचे मंडल अधिकारी यांनी संबंधित ग्रामसेवक तलाठी यांचे अहवाल सादर केल्यानंतर प्रशासन कायदेशीर कारवाई करेल असा इशारा दिला. गरज नसताना रेमडेसीवीर इंजेक्शन दिल्यामुळे राज्यमंत्र्याच्या चालकाची प्रकृती बिघडल्याचा प्रसंग आयुष प्रसाद यांनी सांगितला. ते म्हणाले, देशात सर्वाधिक रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजन वापरणारा पुणे जिल्हा आहे. या वापरा विषयी डॉक्टरांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या बाबत डॉक्टरांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत.

हेही वाचा: पुणे-मुंबई महामार्गावरील ढाबा पोलिसांकडून सील

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, “डॉक्टरांनी नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन आणण्यासाठी चिट्टी देऊ नये. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला इंजेक्शन देऊ नये. सिटीस्कोर बाराच्या पुढे असणाऱ्यांनाच इंजेक्शन द्यावे.” “रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असल्याची तक्रार देवदत्त निकम यांनी केली.” रमा जोशी, डॉ. अंबादास देवमाने, राजाराम बाणखेले, डॉ. सुरेश ढेकळे यांनी चर्चेत भाग घेतला.

रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन प्रमाणेच फॅबीफ्लू गोळ्याचा तुटवडा निर्माण होईल. अजून सहा महिने पुरेल एवढा औषधांचा साठा प्रशासनाने आंबेगाव तालुक्यात ठेवावा. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व औषधे सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिली जातील.- दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

हेही वाचा: पिंपरी ; ‘मोफत बेड’साठी मागितले एक लाख