चंद्रपूर काँग्रेस

चंद्रपूर काँग्रेस
Published on

चंद्रपुरात राजकीय घडामोडींना वेग; ४२ नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात?

विजय वडेट्टीवार यांचा दावा; महापौर बदलाची शक्यता व्यक्त
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : चंद्रपूर महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत असून, ४२ नगरसेवक काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे केला. लवकरच महापौर बदलून काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
महापौर निवडणुकीत काँग्रेसकडे अधिक संख्याबळ असतानाही भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवला होता. फेब्रुवारीत झालेल्या या निवडणुकीत खांडेकर यांना ३२ मते, तर काँग्रेसच्या सोनाली महाडुळे यांना ३१ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने सत्ता समीकरण बदलले होते.
भाजपने ठाकरे गटाच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली असून महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांसाठी वाटून घेण्याचे ठरले आहे. या घडामोडींमुळे सर्वाधिक २७ सदस्य असलेल्या काँग्रेसच्या हातून महापौरपद निसटले, तर २२ नगरसेवक असलेल्या भाजपकडे सत्ता गेली.
या पार्श्वभूमीवर, वडेट्टीवार यांच्या दाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी चंद्रपूरमध्ये लवकरच राजकीय बदल घडण्याचे संकेत दिले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारवर टीका करत, सत्तेत आल्यानंतर भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा विसर पडल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीबाबत विचारले असता, वैयक्तिक भेटींवर भाष्य करणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.
--
चौकट
मुख्यमंत्री गप्प का?
धार्मिक वक्ते धीरेंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली. महाराजांचा अपमान होत असताना मुख्यमंत्री गप्प का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com