गुरुपौर्णिमेनिमित्तचं मोठं दान; आश्रमशाळेला सव्वा लाखांची पुस्तके दिली भेट!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

संगीत क्लास, कापडी पिशव्या शिवून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते ही आश्रमशाळा चालवतात. मात्र तीन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती.

पुणे : 'चपराक प्रकाशन'च्या वतीने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सव्वा लाख रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली आहेत. इंदापूर तालुक्यातील श्रावणबाळ आश्रमशाळेला ही पुस्तकरुपी मदत देण्यात आलीय. आर्थिक विवंचनेत असतानाही स्वाभिमान जपणाऱ्या या संस्थेला 'चपराक प्रकाशन'चे प्रमुख घनश्याम पाटील यांनी मदत केली आहे. ज्येष्ठ लेखक, इतिहास संशोधक संजय सोनवणी यांच्या हस्ते ही पुस्तके आश्रमशाळेला रवाना करण्यात आली.

Breaking : लॉकडाऊनबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी केली मोठी घोषणा; वाचा सविस्तर बातमी!​

राजीव करडे यांनी सहा वर्षापूर्वी संस्थेची स्थापना केली. यामध्ये राज्यभरातील अनाथ तसेच बेघर मुले निवासासाठी आहेत. मात्र शाळेचे प्रमुख करडे यांनी कोणतीही शासकीय अथवा वैयक्तिक स्वरुपाची मदत स्वीकारली नाही. संगीत क्लास, कापडी पिशव्या शिवून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते ही आश्रमशाळा चालवतात. मात्र तीन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती. त्यामुळे 'चपराक प्रकाशन'च्या पाटील यांच्याकडे सवलतीच्या दरात पुस्तकांची मागणी केली होती. मात्र क्षणाचाही विलंब न करता पाटील यांनी 'चपराक'ने प्रकाशित केलेले तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचे ग्रंथ मदत स्वरूपात देण्यात आले. 

कोरोनाला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी कसली कंबर; आणखी चार आयएएस अधिकारी केले तैनात!​

समाजातील तळागाळात काम करणाऱ्या स्वाभिमानी संस्थांना मदत करणे ही आम्ही आमची नैतिक जबाबदारी समजतो. त्यामुळेच आम्ही ही पुस्तकरुपी मदत दिली आहे.
- घनश्याम पाटील, संपादक, चपराक प्रकाशन, पुणे.

कापडी पिशव्या शिवून, त्याच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून आम्ही मुलांचा सांभाळ करतो मात्र लॉकडाऊनमुळे तीन महिन्यात पिशव्या शिवण्यासाठी कच्चा माल मिळाला नाही. त्यामुळे संस्थेचा रोजगार पूर्णपणे थांबला होता. तब्बल सव्वा लाख रुपये किमतीची नवीकोरी पुस्तके संस्थेला भेट दिल्याने त्याच्या विक्रीतून आमच्या संस्थेस मोठा हातभार मिळणार आहे.
- राजीव करडे, संस्थापक, श्रावणबाळ आश्रमशाळा, इंदापूर

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chaprak Prakashan donated books to Shravan Bal Ashram Shala on the eve of Guru Purnima