"चासकमान' दीडपट भरेल एवढा धरणातून विसर्ग

राजेंद्र लोथे
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यावर पावसाने घेतलेली दीर्घकाळ विश्रांती, त्यातच चासकमान धरणातून शिरूर तालुक्‍यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन यामुळे चालू वर्षी धरण भरते की नाही या विवंचनेत सगळे होते. त्यात मुसळधार पावसामुळे सगळ्यांचे अंदाज फोल ठरवले. धरण तर भरलेच, पण केवळ चौदा दिवसांत दीडपट धरण भरेल एवढ्या म्हणजेच सुमारे बारा टीएमसी पाण्याचा विसर्ग धरणातून करावा लागला.

चास (पुणे) : सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यावर पावसाने घेतलेली दीर्घकाळ विश्रांती, त्यातच चासकमान धरणातून शिरूर तालुक्‍यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन यामुळे चालू वर्षी धरण भरते की नाही या विवंचनेत सगळे होते. त्यात मुसळधार पावसामुळे सगळ्यांचे अंदाज फोल ठरवले. धरण तर भरलेच, पण केवळ चौदा दिवसांत दीडपट धरण भरेल एवढ्या म्हणजेच सुमारे बारा टीएमसी पाण्याचा विसर्ग धरणातून करावा लागला.

चास-कमान धरणाची क्षमता 8.53 टीएमसी आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाळ्याच्या सुरवातीच्या टप्प्यात जेमतेम पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा 24 जुलैपर्यंत केवळ 48 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला होता. कारण मागील वर्षाच्या तुलनेत तो पन्नास टक्‍क्‍यांनी कमी असल्याने परिस्थिती चिंताजनक होती. त्याचबरोबर शिरूर तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थिती पाहता धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 17 जुलैपासून 550 क्‍युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा वाढत नव्हता. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष चासकमान धरणातील पाणीसाठ्याकडे लागले होते. मात्र, 25 जुलैपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली व बघताबघता पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली.

27 जुलै रोजी पाणीसाठा वेगाने वाढल्याने 28 जुलै रोजी धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. 4 ऑगस्ट रोजी सर्वाधिक म्हणजे 50112 क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला. 28 जुलै रोजी सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग 17 ऑगस्ट रोजी बंद करण्यात आला. मात्र, 28 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत धरणातून तब्बल बारा टीएमसी पाणी खाली वाहून गेले. म्हणजेच धरणाच्या क्षमतेपेक्षा दीडपट पाणी चौदा दिवसांतच वाहून गेले. सद्यःस्थितीत धरणात शंभर टक्के पाणीसाठा असून नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद केलेला आहे. तर कालव्याद्वारे 575 क्‍युसेक वेगाने आवर्तन सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chaskaman Dam Overflow