मुंबईत शाहू महाराजांचे स्मारक उभारावे - इंद्रजीत सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati shahu Maharaj

‘छत्रपती शाहू महाराजांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथे स्मृतिस्तंभाचे गुरुवारी अनावरण करण्यात येणार आहे.

मुंबईत शाहू महाराजांचे स्मारक उभारावे - इंद्रजीत सावंत

पुणे - ‘छत्रपती शाहू महाराजांचे (Chhatrapati Shahu Maharaj) निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथे स्मृतिस्तंभाचे (Memorial) गुरुवारी अनावरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मुंबईत शाहू महाराजांचे भव्य स्मारक भवन उभे करावे. बहुजन समाजाच्या चळवळीचे ते केंद्र व्हावे म्हणून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी केले.

राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीने कोल्हापूर येथून शाहू विचार जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जागर यात्रा बुधवारी (ता. ४) सायंकाळी पुण्यात पोचली. यानंतर शिवाजी मेमोरिअल सोसायटी येथे आयोजित अभिवादन सभेत सावंत बोलत होते. शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे खजिनदार अजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सचिव डी. डी. देशमुख, ॲड. अनंत दारवटकर, बबनराव रानगे आदी या वेळी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, ‘पुणे शहर हे बहुजन समाजाच्या चळवळीचे केंद्र बनले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी १८८५ मध्ये पुण्यातील हिराबागेत महात्मा फुले यांनी सभा घेतली, परंतु त्याबाबत तथाकथित शिवप्रेमींकडून हेतुपुरस्सर खोटे दावे केले जात आहेत. याबाबत आमच्याकडे सबळ पुरावे आहेत.’

गायकवाड म्हणाले, ‘सध्या फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्यांना बहुजनवादी म्हटले जाते. तसेच जे हिंदू- मुस्लिम यांच्यात वाद उत्पन्न करण्याचे काम करतात, त्यांना जातीयवादी म्हटले जाते. त्यामुळे नागरिकांनीच आता कोण जातीयवादी आहे, हे ठरवावे. सध्याचे सामाजिक वातावरण पाहता पुन्हा बहुजनांची चळवळ ही संघटित करण्याची गरज आहे.’