शिवरायांचे अप्रकाशित पत्र सापडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची कामकाजाची पद्धत, राजकीय आणि प्रशासकीय धोरण अधोरेखित करणारे खुद्द महाराजांचेच अप्रकाशित पत्र मिळाले आहे. शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र मिळाले आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची कामकाजाची पद्धत, राजकीय आणि प्रशासकीय धोरण अधोरेखित करणारे खुद्द महाराजांचेच अप्रकाशित पत्र मिळाले आहे. शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र मिळाले आहे.

डॉ. फाळके यांनी शिवछत्रपतींच्या कार्यावर पीएचडी मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी ते अभ्यासासाठी धुळ्यामधील दफ्तरखान्यातील पत्रे चाळत होते. दरम्यान, त्यांना महाराजांचे अस्सल मुद्रा उमटविलेले हे पत्र हाती लागले. महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी (18 ऑगस्ट 1673) "सातारा'चे सुभेदार अबाजी मोरदेव यांना महाराजांनी हे पत्र पाठवले आहे. या पत्रातून पाटीलकी वतनासंबंधात कान्होजी खराडे आणि काळभर यांच्यातील वादावर दिलेला निवाडा आहे. हे पत्र स्वराज्यातील प्रशासनात 27 जुलै 1673 मध्ये दाखल झाले. स्वराज्यात दाखल झालेल्या प्रदेशाची प्रशासकीय व्यवस्था लावण्यासंदर्भात महाराजांची दक्षता या पत्रातून दिसून येत असल्याचे डॉ. फाळके यांनी नमूद केले.

ते म्हणाले, "हे पत्र राज्याभिषेकापूर्वीचे असून त्या वेळी "पाटीलकी' वतनासंबंधात खराडे आणि काळभर यांच्यात वाद सुरू होता. ही बाब महाराजांच्या कानावर आली. त्यावर खराडे यांना समज द्यावी तसेच त्यांची घोडी किंवा माणसे पालीमध्ये असतील, तर त्यांना बाहेर घालवावे आणि गावातल्या पिकांची लावणी, संचणीची कामे काळभरांकडून करून घ्यावीत, असा आदेश महाराजांनी दिला होता. या पत्रावर दोन ओळींनंतर महाराजांच्या प्रधानाचा शिक्का असून पत्राच्या शेवटी महाराजांच्या मुद्रा आहे. शिवाय भारत इतिहास संशोधक मंडळात असणाऱ्या महाराजांच्या अस्सल कौलनाम्यातल्या हस्ताक्षरासारखे या पत्रातील हस्ताक्षर आहे.''

आजवर महाराजांची जवळपास 250हून अधिक पत्रे मिळाली आहेत. या पत्रातले अक्षर, वाक्‍यरचना, भाषाशैली ही महाराजांच्या अन्य पत्रांसारखीच आहे. या पत्रावर आणखी संशोधन सुरू असून डॉ. वि. आ. चितळे, शरद कुबेर, रमण चितळे हे सहकार्य करत आहेत, असे डॉ. फाळके यांनी सांगितले.

Web Title: chhatrapati shivaji maharaj's unpublished letter found