कपबशा धुतल्या, चहा विकला...तरीही गुणांचा आकडा कडकच... 

tejas
tejas

शिरूर (पुणे) : पहाटे पाचला उठून अभ्यास...सात वाजता हातगाडी लावून चहाविक्री...दहा ते पाच शाळा...आणि शाळेतून आल्यावर परत चहाच्या स्टॉलवर वडिलांना मदत...कपबशा विसळण्यापासून ते स्टॉलवरील भांडी घासून स्वच्छ करण्यापर्यंतची सर्व कामे...रात्री नऊ ते बारा आणि कधीकधी एक- दोन वाजेपर्यंत अभ्यास...चाय गरम, चाय गरम अशी आरोळी देत त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेदरम्यान चहाच्या स्टॉलवरची भांडी व कप चकचकीत करताना तब्बल नव्वद टक्के गुण मिळवून तेवढेच चकचकीत यश देखील मिळविले

शिरूर येथील बसस्थानकासमोर चहाच्या गाडीवर वडीलांना मदत करणाऱया तेजस राजेंद्र घोरपडे या विद्यार्थ्याचे दहावीतील हे यश थक्क करणारे आहे. येथील विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल तांबोळी व सर्वच मार्गदर्शक शिक्षकांनी तेजस याची परिस्थिती ओळखून त्याला यथायोग्यरित्या घडविले. आई- वडीलांनी पडेल ती कामे करून आणि सर्व खर्चात काटकसर करून तेजसच्या शैक्षणिक गरजांत कमतरता पडू दिली नाही. त्याची जाणीव ठेवत तेजसने तेजस्वी यश मिळविले. 

मूळचे रूई बाभळगाव येथील राजेंद्र घोरपडे हे रांजणगाव येथील एका मोठ्या कंपनीत कामाला होते. चांगला पगार मिळत असल्याने कुटुंब सुस्थितीत होते. त्यातून मुलांना शिकवून खूप मोठे करण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु, १५ वर्षापूर्वी कंपनी बंद पडली अन् त्यांच्यासह अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. राजेंद्र यांचे कुटुंब रस्त्यावर आले. पण, त्यांनी स्वतःसह कुटुंबाला सावरत शिरूरच्या बसस्थानकासमोर हातगाडीवर चहाचा छोटासा स्टॉल थाटला. पत्नीनेही त्यांना सर्वतोपरी मदत केली. तेजस व त्याचा छोटा भाऊ यांना वाढवताना आणि घडवताना या दांपत्याने पोटाला चिमटा घेत, काटकसर करीत संसाराचा गाडा ओढला. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
    
आई- वडीलांचे हे कष्ट आणि आपल्या शिक्षणावर होणारा खर्च छोट्या तेजसच्या अल्पवयातच लक्षात आला. पाचवीत असल्यापासूनच तो वडीलांना चहाच्या स्टॉलवर सर्वतोपरी मदत करू लागला. ग्राहकांना चहा देणे, कपबशा विसळणे, अशी छोटी- मोठी कामे करीत पुढे फक्कड चहा बनवायलाही तो शिकला. आठवीला असल्यापासून निम्मा वेळ तोच चहाचा स्टॉल सांभाळायचा. दहावीत गेल्यावर आणि अभ्यासाचा खूप ताण असल्याने आई- वडीलांनी त्याला अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून स्टॉलवर न येण्यास बजावले. परंतु, स्वतःच्या अभ्यासाच्या वेळा सांभाळून, तेजसने कुटूंबाच्या या मदत कार्यात खंड पडू दिला नाही. दररोज पहाटे पाच वाजता उठायचे. पाच ते सात अभ्यास, सात वाजता चहाचा स्टॉल सुरू करायचा, वडील नऊ वाजता आल्यानंतर घरी जाऊन आवरून दहा वाजता शाळेत जायचे. जादा तासांसह पाच वाजेपर्यंत शाळा. पाचला आल्यानंतर सहा ते नऊ़ तर कधीकधी दहावाजेपर्यंत स्टॉलवरच आणि मग तिथून पुढे घरी गेल्यावर जेवण करून अभ्यास करायचा. रात्री बारा वाजेपर्यंत नित्यनेमाने़ तर कधीकधी एक ते दोन वाजेपर्यंत त्याचा अभ्यास सुरू असायचा. 
    
कुठलीही खासगी शिकवणी किंवा बाहेरचे क्लास न लावता केवळ शाळेतील शिक्षण आणि काम करता करता मन लावून जिद्दीने केलेला अभ्यास यातून तेजसने हे यश मिळविले. तेजसच्या या यशाचा आनंद साजरा करताना तेजससह त्याचे आई- वडील भाऊ अन मित्र आजही नेहमीप्रमाणे आपल्या चहाच्या स्टॉलवरच होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com