Video : प्रभू येशूच्या आगमनासाठी जय्यत तयारी, फराळ पाहिला का?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

चमचमणाऱ्या चांदण्या, रंगीबिरंगी विद्युतरोषणाईने झळकणारे ख्रिसमस ट्री, रंगछटांसह विद्युतरोषणाईने उजाळून निघालेले चर्च, सांताक्‍लॉजच्या लाल टोप्या, अशा उत्साहपूर्ण वातावरणात खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी आहे. 

पुणे - चमचमणाऱ्या चांदण्या, रंगीबिरंगी विद्युतरोषणाईने झळकणारे ख्रिसमस ट्री, रंगछटांसह विद्युतरोषणाईने उजाळून निघालेले चर्च, सांताक्‍लॉजच्या लाल टोप्या, अशा उत्साहपूर्ण वातावरणात खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी आहे. दुसरीकडे घरोघरी फराळ, प्रभू येशूच्या आगमनाची जय्यत तयारी, बालगोपाळांचे कॅरल सिंगिंग, असे आनंदोत्सवाचे वातावरण नाताळच्या Christmas Festival पूर्वसंध्येला शहरामध्ये होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, वडगाव शेरी, खडकी या भागामध्ये नाताळच्या खरेदीस नागरिकांनी प्राधान्य दिले. भेटवस्तू, फराळ, केक, डोनट यासह कपडे, ख्रिसमस ट्री, सजावटीच्या वस्तू ग्राहक खरेदी करीत होते. विद्युतरोषणाईने झगमगणारे ख्रिसमस ट्री, सांताक्‍लॉजची टोपी व सजावटीच्या वस्तूंनी स्टॉल सजले आहेत. घरोघरी येशूच्या जन्माची जय्यत तयारी सुरू होती. महिला फराळ करण्यात गुंतल्या होत्या. तर लहान मुले, तरुण-तरुणी घरोघरी जाऊन कॅरल सिंगिंग करण्यासह शुभेच्छा देत होते.

मुख्यमंत्री ठाकरे बुधवारी पुण्यात; कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित

"जिंगल बेल जिंगल बेल'चे स्वर
घरोघरी व चर्चमध्ये "जिंगल बेल जिंगल बेल'चे स्वर ऐकू येत होते. लष्कर, वडगाव शेरी, खडकीतील चर्चमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण आहे. चर्चमध्ये रोषणाई, चांदणी, फुगे, फुलांची सजावट, गालिचे अंथरून जय्यत तयारी केली. सार्वजनिक ठिकाणी येशूच्या जन्मसोहळ्याचे देखावे तयार करण्यात येत आहेत. नाताळच्या सकाळच्या प्रार्थनेसाठीही चर्चकडून तयारी सुरू आहे.ख्रिसमस गीत, येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित संदेशाबरोबरच यंदा नृत्य, गाणी, नाटकांचे आयोजन चर्चमध्ये केले आहे. लहानांपासून ज्येष्ठ तर सर्व धर्मांतील लोक नाताळच्या स्वागताची तयारी करीत आहेत. चर्चबाहेर जिंगल बेल्स आणि स्टार लावले आहेत.

ख्रिसमस सण हा केवळ ख्रिस्ती धर्माचाच नाही, तर सर्वधर्मीयांचा आहे. कोणी चर्च रंगरंगोटीचे, तर कोणी ख्रिसमस ट्री, येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठीच्या गव्हाण सजविण्याच्या कामात गुंतले होते. सेंट पॅट्रिक्‍स चर्चमध्ये पंधरा हजारहून अधिक भाविक येतात. इथे जातिभेदाला थारा नाही. स्त्री-पिुरुष समानतेला प्राधान्य दिले जाते.
- बिशप थॉमस डाबरे, धर्मगुरू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Christmas Festival preparation in pune churches gets ready