धक्कादायक : कोथरुडमधील क्वारंटाइन सेंटरमधून 28 नागरिक गेले पळून, हे आहे कारण..

Quarantine.jpg
Quarantine.jpg

कोथरुड (पुणे) : एरंडवणा येथील पंडीत दिनदयाळ शाळेत क्वारंटाइन केलेल्या २८ नागरिकांनी पत्रे उचकटून घराकडे पळ काढल्याची घटना बुधवारी घढली. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्यावर अधिका-यांची धावाधाव झाली. दरम्यान हे नागरिक त्यांच्या घरी सापडल्यावर अधिका-यांनी त्यांची समजूत काढली. यातील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने क्वारंटाइन सेंटरकडे होणाऱ्या दुर्लक्षाचे काय दुष्परिणाम होतील याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कमालीची अस्वच्छता, योग्य सुविधा नसल्याने आम्ही घरी निघून आलो असा आरोप घरी आलेल्या नागरिकांनी केला.

यासंदर्भात चौकशी केली असता, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले की, एरंडवणा येथील नागरिकांना दिनदयाळ शाळेत दोन दिवसापूर्वी क्वारंटाइन केले होते. तपासणी अहवाल यायला उशीर झाला म्हणून या नागरिकांनी घराकडे पळ काढला होता. यातील पॉझिटीव्ह रुग्णांना दवाखान्यात दाखल केले आहे. क्वारंटाइन सेंटरच्या समन्वयक तेजस्विनी घोडके म्हणाल्या की, सात चाळ एरंडवणा, व गणेशनगर येथील ४५ लोकांना क्वारंटाइन केले होते. यातील ३६ जणांची तपासणी बिंदू माधव ठाकरे रुग्णालयात तर उर्वरीत नऊ जणांची तपासणी दुस-या केंद्रात केली होती.

दोन जुलै रोजी सकाळी ९ जणांचा तपासणी अहवाल आला. त्यातील दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. सात जणांना होम क्वारंटाइन रहायला सांगितले. ठाकरे रुग्णालयात तपासणी केलेल्या ३६ जणांचा अहवाल येत नसल्याने त्यांचा मानसिक समतोल ढळला. चीडचीड वाढली. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तपासण्यांची संख्या वाढत चालल्याने तपासणी केंद्रावरचा ताण वाढत असल्याची कल्पना दिली. परंतु, हे नागरिक ऐकायला तयार नव्हते. ३६ पैकी २८ जणांनी आमच्या विनंतीला न जुमानता घरी पळ काढला. मात्र, आठ जणांनी आमचे ऐकले. दुपारनंतर तपासणी अहवाल मिळाल्यावर या २८ पैकी सहाजण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले.

आम्ही पोलिसांच्या मदतीने या सहा जणांना सिंहगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. क्वारंटाइन सेंटर अस्वच्छ असल्याचा आरोप घोडके यांनी फेटाळला. घोडके म्हणाल्या की, सेंटरवर थांबलेल्या आठ जणांपैकी एका कुटुंबाने येथे सफाई काम करणा-यांना स्वखुशीने दोनशे रुपये दिले. येथे जर कामगार व्यवस्थित काम करत नसते तर असे घडलेच नसते. नागरिकांनी स्वतःच्या व समाजाच्या हिताकरीता प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

एकीकडे अधिकारी रोज चार वेळा स्वच्छता केली जात असल्याचे सांगत असले तरी क्वारंटाइन सेंटरमधील अस्वच्छता, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे, पिण्याचे पाणी, भोजन, तपासणी अहवाल मिळण्यात होणारी दिरंगाई याबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रार दिसते. तपासणी यंत्रणामध्ये असलेल्या त्रुटी दुर केल्यास नागरिकांचे सहकार्य वाढेल. क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना चांगली वागणूक मिळणे अपेक्षित असतानाच या नागरिकांनीही व्यवस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करायचे कर्तव्य बजवायला हवे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोथरुड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत ४ जुलैपर्यंत ७१९ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यातील ४२६ लोक कोरोनामुक्त झाले असून १४ जण मृत्युूमुखी पडले. २७९ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ३ जुलैपर्यंत  ७५१ रुग्ण आढळले. यातील ६२ जण कोरोनामुक्त झाले असून ११ जण मृृत्यूमुखी पडले. ६८१जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com