

छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पक्षाची (सीजेपी)ची पहिली राष्ट्रीय दोन दिवसीय बैठक आज येथे सिडको वाळूज महानगर-एक येथे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी सुरू झाली. सकाळी अकराला सुरू झालेली बैठक सहा तास चालली. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या प्रमुख पदाधिकारी, प्रवक्ते आणि संघटनात्मक प्रतिनिधींनी या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा आणि संघटनात्मक विस्तारावर सखोल विचारमंथन केले. संघटनात्मक बांधणी, आगामी जनआंदोलनाची रणनीती आणि देशभर विस्तार करण्यात येणार आहे. सध्या पक्ष कोणतीही निवडणूक लढविणार नसून लोकहिताच्या प्रश्नांसाठी शासनावर दबाव गट म्हणून कार्य करण्याच्या भूमिकेवर सीजेपीच्या बैठकीत एकमत झाले.
शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्षांवरील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास, ई-२० संदर्भातील घडामोडी, वाढती बेरोजगारी तसेच देशासमोरील आर्थिक आव्हाने या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या सत्रात देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविलेल्या सूचना व मागण्यांवर विचार करून पक्षाचे पुढील ध्येयधोरण, आंदोलनाची रूपरेषा आणि संघटनात्मक विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
बैठकीस संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास, रत्नासिंग, वैष्णवी गौर तसेच देशभरातील १३ ते १५ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जंतर-मंतर आंदोलनानंतर सीजेपीची पहिली राष्ट्रीय बैठक होत असल्याने दीपके यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
झारखंडच्या आंदोलनाला पाठिंबा
झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला सीजेपीने पाठिंबा जाहीर केला असून, तेथील पक्षाचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. लवकरच पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्वही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आशुतोष रांका यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.