
उड्डाणपुलामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ
कोथरूड : आधी कोरोना आणि नंतर नळस्टाॅप जवळील उड्डाण पुलाचे काम यामुळे व्यवसाय मोडकळीस आला. आता उड्डाण पूल सुरू झाला; परंतु त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी गुंता वाढत चालला आहे. सुधारणेच्या नावाखाली जी समस्या निर्माण केली आहे, त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली, अशी त्रस्त भावना कर्वे रस्ता व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
क्षमा वाघ म्हणाल्या, ‘‘नवीन उड्डाण पुलापाशीच माझे दुकान आहे. ३० वर्षे मी व्यवसाय करत आहे. पावसात स्टेट बँकेजवळ या रस्त्याची वाट लागणार आहे. एक पाऊस पडला की कर्वे रस्त्याची धारावी होणार आहे. उड्डाण पुलाखाली तीन मीटरचा रस्ता उपलब्ध असतो. त्यातून वाहने कशी जाणार? या लोकांनी वनाजचा कचरा डेपो काढला आणि नळस्टॉपला आणला आहे. हे पुला खाली उद्यान करणार होते. ना वाहतुक सुरळीत ना उद्यान. येथे टाकला जातोय कचरा. व्यापाऱ्यांकडून विविध कर घेता, मग त्यांना योग्य सुविधा द्यायला नको का?’’
हस्तिमल चंगेडिया म्हणाले, ‘‘जड वाहने रात्री सहा ते दहा बंद ठेवावीत. ग्राहकांनी वाहने कुठे लावायची हा मोठा प्रश्न आहे. पुलाखाली पे अँड पार्क करणे गरजेचे आहे. वरून वाहने गेली की लागू बंधूंच्या तिथे व विधी महाविद्यालय रस्त्यावर वाहने ब्लॉक होतात.’’
पुलाखाली ‘पे अँड पार्क’सुविधा द्या
संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, काल वाहतूक विभागाने ‘एसएनडीटी’कडून यू टर्न बंद केला आहे. हा उड्डाण पूल चुकीचा केला आहे. या रस्त्याने लोक चालायचे. आता या रस्त्याने चालण्याची कोणाची हिंमत होणार नाही. पुलामुळे रस्ता अरुंद झाला आहे. काल एक बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करताना अडकली. त्यामुळे बराच वेळ वाहतकू कोंडी झाली. रुग्णवाहिका जायलादेखील जागा राहत नाही. व्यापाऱ्यांकडून पैसा घेतात, भरमसाठ कर घेतात; पण सुविधांचे काय? त्या काहीच मिळत नाही.
कर्वे रस्ता व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून कर्वे रस्ता मेट्रो पुलाखाली तसेच डेबल डेकर पुलाखाली पे अँड पार्क सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, पुलाच्या चुकीच्या कामामुळे आमचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने योग्य उपाययोजना न झाल्यास आंदोलन करू. स्मार्ट सिटीला कचरा सिटी बनवू नका.
काय आहेत आक्षेप?
पूर्वी सात मीटर रस्ता होता. आता तो तीन मीटर झाला आहे.
धोरणकर्त्यांच्या चुकांमुळे व्यापारी आणि नागरिकांना त्रास
या उड्डाण पुलाची काहीच गरज नव्हती
कर्वे रस्त्याने पंधरा लाख नागरिक रोज ये-जा करतात
ज्यांनी प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनी त्यावर मार्ग पण काढून द्यावाो
मोठे महामार्ग करताना जागामालकांना पाचपट मोबदला दिला जातो. त्या जागा नंतर सरकार विकसित करते, तसेच येथे ज्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, त्यांच्या जागा मोबदला देऊन सरकारने विकत घ्याव्यात. आरक्षित जागांचे मालक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे पार्किंगला जागा मिळत नाही. व्यवसाय नसेल तर लोक इमारत विकून निघून जातील. माझा व्यवसाय मी स्थलांतरित केला. नो पार्किंगचे फलक लावतात. पण पार्किंग कुठे करायचे ते लिहिलेले नाही.
- अजित सांगळे, नागरिक