पुण्यात मुख्यमंत्री सचिवालय सुरू, पण कुठे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

कार्यवाहीसाठी पाठविलेले अर्ज, त्यावर केलेली कार्यवाही आणि प्रलंबित अर्जांची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी सादर करण्यात येणार आहे. 

पुणे : जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडविण्यासोबतच मंत्रालयीन पातळीवरील कामे गतीने करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' सोमवार (ता.20)पासून कार्यान्वित करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कक्षामध्ये मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने स्वीकारण्यात येणार असून, पुढील कार्यवाहीसाठी ते क्षेत्रीय अधिकारी आणि मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. यानुसार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे उद्‌घाटन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. महसूल उपायुक्त प्रताप जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे आदी या वेळी उपस्थित होते. 

- 'टायगर शार्क' दक्षिण किनारपट्टीला देणार 'सुखोई' संरक्षण!

विभागाचे महसूल उपायुक्त हे या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. नायब तहसीलदार आणि लिपिक यांची नियुक्ती देखील या कक्षासाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने आणि संदर्भ या कक्षात स्वीकारून संबंधितास त्याची पोचपावती देण्यात येईल. क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अपेक्षित असलेले अर्ज आणि निवेदने विभागीय आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. 

- ICC ODI Rankings : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंचा दबदबा कायम; जडेजाची एन्ट्री!

तसेच, महत्त्वांच्या प्रकरणांशी संबंधित अर्ज अथवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येतील. कार्यवाहीसाठी पाठविलेले अर्ज, त्यावर केलेली कार्यवाही आणि प्रलंबित अर्जांची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी सादर करण्यात येणार आहे. 

- ...अन् जखमींच्या मदतीला धावले पोलिस आणि आरोपी!

नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज किंवा निवेदने विभागीय आयुक्त कार्यालयातील 'मुख्यमंत्री सचिवालय कक्षात' सादर करावीत. त्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल. मुख्यमंत्री सचिवालय कक्षामुळे नागरिकांचे प्रश्‍न गतीने सोडविण्यास मदत होईल. 
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्‍त, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CMO was operational in the Pune Divisional Commissioners Office from Monday