...अन् जखमींच्या मदतीला धावले पोलिस आणि आरोपी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्याकडेला असलेल्या वीजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे वीजेचा खांब खाली पडला.

पुणे : लग्नाच्या स्वागतसमारंभासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या दोन दुचाकींना मद्यधुंद कारचालकाने जबर धडक दिली. या घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही घटना रविवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तालयाजवळील बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहासमोर घडली. अपघातानंतर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार वीजेच्या खांबावर जाऊन आदळल्याने वीजेचा खांब कोसळला. 

याप्रकरणी श्रीकांत अशोक पवळे (वय 35, रा. विडी कामगार वसाहत, गणेशनगर, येरवडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर या अपघातामध्ये प्रतिभा मुकुंद परदेशी (वय 44), त्यांचे पती मुकुंद (वय 55), मुलगा निखिल (वय 22), निहाल (वय 25) हे जखमी झाले. मुकुंद परदेशी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

- पुणे : 'डीएसके ड्रिमसिटी'साठी नवीन बिल्डर नेमा; न्यायालयात प्रस्ताव!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी कुटुंबीय त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नाच्या स्वागत समारंभ कोरेगाव पार्क येथे होता. त्यासाठी चौघेजण दोन दुचाकीवरुन पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकी बी. जी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहासमोर आल्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव कार त्यांच्या दिशेने आली.

संबंधित कारने पहिल्यांदा फिर्यादी व त्यांच्या पत्नी असे दोघेजण जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कारचालक तेथून पुन्हा वेगात निघून जात होता. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीवरुन जाणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने त्यांच्या मुलांच्या दुचाकीलाही जाणीवपूर्वक धडक दिली. त्यामुळे फिर्यादी, त्यांच्या पत्नीसह दोन्ही मुलेही गंभीर जखमी झाले.

- ‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेस’च्या नावाखाली चित्रपटाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून लूट

त्यानंतर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्याकडेला असलेल्या वीजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे वीजेचा खांब खाली पडला. त्याचवेळी कारमधील एअर बॅग खुली झाल्यामुळे कारचालक बचावला. त्यानंतर तेथून जाणाऱ्या पोलिसांनी कारचालक पवळे यास ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील करीत आहेत. 

- वधुच्या आईला लग्नाचे फोटोसेशन पडले महागात; वाचा काय घडले?

जखमींच्या मदतीसाठी धावले पोलिस आणि आरोपीही! 

अपघाताच्या काही वेळेपूर्वीच पोलिसांच्या अमली आणि खंडणी विरोधी पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा घातला होता. तेथून पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांना घेऊन सर्वजण पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने येत होते.

त्यावेळी अपघात पाहून पोलीस कर्मचारी रमेश गरूड, अमोल पिलाणे, फिरोज बागवान, मनोज शिंदे, मंगेश पवार यांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आठ आरोपींचीही मदत घेत जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police and accused ran to help the injured in two wheeler and car accident