'डीम्ड कन्व्हेयन्स' अभियानात उतरले खुद्द सहकार आयुक्‍त!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

औंध येथील कुमार प्रेरणा सोसायटीच्या क्‍लब हाऊस येथे शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. 

पुणे : अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) अभियान यशस्वी करण्यासाठी राज्याचे सहकार आयुक्‍त अनिल कवडे हे खुद्द अभियानात उतरले आहेत. त्यांनी शनिवारी (ता.९) शहरातील काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना मार्गदर्शन केले. 

एखाद्या विकसकाकडून गृहनिर्माण सोसायटीचे हस्तांतरण (कन्व्हेयन्स डीड) न केल्यास गृहनिर्माण सोसायट्यांना सहकार विभागाच्या मदतीने डीम्ड कन्व्हेयन्स करून घेता येते. त्यामुळे संबंधित गृहनिर्माण सोसायटीला त्यांच्या संपूर्ण जागेचा मालकी हक्‍क मिळतो. 

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर​

राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या वतीने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी डीम्ड कन्व्हेयन्स अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाच्या वतीने हे अभियान सुरू आहे. शहराच्या विविध भागातील सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोथरूड येथील हॅप्पी कॉलनी सभागृहात नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

औंध येथील गृहनिर्माण संस्थांचा प्रतिसाद 
औंध येथे डीम्ड कन्व्हेयन्सबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. औंध येथील कुमार प्रेरणा सोसायटीच्या क्‍लब हाऊस येथे शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. 

अखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर​

या कार्यक्रमास सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, स्नेहा जोशी आदी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना डीम्ड कन्व्हेयन्सविषयी मार्गदर्शन केले. तसेच, उपस्थित विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, महासंघाच्या औंध-बाणेर-पाषाण शाखेच्या अध्यक्षा प्रिती शिरोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच, रविवारी (ता. 10) सूस रस्ता पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता कार्यक्रम होणार आहे. कोकाटे तालीम संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमार सहकार आयुक्‍त उपस्थित राहणार आहेत. 

संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले​

उंड्री आणि पिसोळीत अभियान 
उंड्री आणि पिसोळी येथील गृहनिर्माण सोसायट्यांसाठी अमित कलरी क्‍लब हाऊस येथे शनिवारी अभियानाचे आयोजन करण्यात आले. हवेली पंचायत समितीचे उपसभापती सचिन घुले-पाटील आणि पिसोळीचे माजी सरपंच नवनाथ मासाळ या वेळी उपस्थित होते. शहर उपनिबंधक डॉ. आर. एस. धोंडकर, राधिकेश उत्तरवार, श्रीनिवास शिरगावकर, संतोष शिरस्तवार यांनी डीम्ड कन्व्हेयन्सबाबत मार्गदर्शन केले. 

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner of Co-operation himself joined the Deemed Convenience Campaign