esakal | महावितरणचा कंत्राटी कामगारांनाच ‘शॉक’, सुमारे ३०० कर्मचारी पगाराविना

बोलून बातमी शोधा

MSEDCL
महावितरणचा कंत्राटी कामगारांनाच ‘शॉक’, सुमारे ३०० कर्मचारी पगाराविना
sakal_logo
By
संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर ः कोरोना संसर्ग वाढत असतानाही वीजपुरवठा सुरळीत रहावा आणि महावितरणची वसुलीही जोरात व्हावी यासाठी काम करत असलेले 'कंत्राटी वीज कर्मचारी' स्वतः मात्र चिंतेत आहेत. गेले पावणेचार महिने तीनशे कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांचा पगार मिळालेला नाही. यामुळे ऐन कोरोनाकाळत त्यांच्यावर उसनवारीची आणि उपासमारीची वेळ आली असून काहीजण काम सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत. वीजकंपनीच्या नोकरभरती कपातीच्या धोरणामुळे कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरण्याची प्रथा पडलेली आहे. गेले तेरा-चौदा वर्ष केवळ कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारे असंख्य वीजकर्मचारी आहेत. महावितरणमध्ये काहीजण वायरमन, रिडींगमन तर काहीजण ऑपरेटर म्हणून कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत. महावितरणच्या बारामती ग्रामीण मंडलाने 'गणेश इंडस्ट्रीयल सर्विसेस' या सेवाक्षेत्रातील कंपनीला बारामती विभागाकरिता मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. डिसेंबर २०२० पासून या कंपनीच्या अखत्यारीत बारामती शहर, बारामती ग्रामीण, इंदापूर, सोमेश्वरनगर या उपविभागांमध्ये ३०३ कर्मचारी काम करत आहेत. विशेष म्हणजे डिसेंबरबासून कर्मचारी कार्यरत असले तरी महावितरणकडून मनुष्यबळ पुरविण्याच्या कामाचा आदेश चक्क १२ मार्चला देण्यात आला. या आदेशानंतर गणेश इंडस्ट्रियलने सर्व कर्मचाऱ्यांचा डिसेंबरचा पगार केला. आदेश आल्याने उरलेले पगार तरी लवकर होतील अशी अपेक्षा बाळगून असलेल्या कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी वीजकंपनीच्या वसुली मोहिमेत आणि कोरोनाकाळात घरी थांबलेल्या लोकांना, उद्योगांना अखंडीत वीजपुरवठा देण्याचेही मोलाचे काम केले आहे. दुसरीकडे वसुली मोहिम सुरू असताना आणि पैसे उपलब्ध असतानाही अधिकारी पातळीवरील लालफितीच्या कारभारामुळे गेले पावणेचार महिने पगार मिळू शकले नाहीत. परीणामी यांच्याकडून कामे कशी करून घ्यायची असा प्रश्न उपविभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

एक कर्मचारी म्हणाला, काहीजण दहा वर्षांपासून काम करत आहेत. अनेकांची लग्नही झाली आहेत. कोरोनाकाळातही आघाडीवर राहून काम करत आहेत. मात्र आधीच तुटपुंजा असलेला पगार वीजकंपनी आणि कंत्राटदार वेळेवर देऊ शकले नाहीत. कोरोनामुळे अन्य कामेही मिळत नसल्याने कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पगार लवकरच होणार? गणेश सर्विसेसचे प्रमुख मानसिंग जाधव म्हणाले, कंपनीकडून ऑर्डर आल्या आल्या डिसेंबरचा पगार केला आहे. काही तांत्रिक कारणास्तव तीन महिन्यांचे पगार महावितरणकडून येणे आहेत. ते मिळताच त्वरीत कर्मचाऱ्यांना दिले जातील. दोन दिवसात पगाराचा प्रश्न सुटेल. तर बारामती ग्रामीण मंडलचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील म्हणाले, वीजकर्मचाऱ्यांच्या पगारासंबंधी प्रयत्न सुरू आहेत. वरीष्ठांकडे रकमेसंदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे. एजन्सीलाही आजच बोलावून घेत आहोत आणि काहीतरी बघतो.

हेही वाचा: पुणे : फी नाही, तर परीक्षा नाही! कोथरूडमधील प्रकार