पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या गतीला कोरोना आणि लॉकडाउनचा बसला फटका

Metro
Metro

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या गतीला कोरोना आणि लॉकडाउनचा फटका बसला असल्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत मेट्रोच्या कामाने वेग घेतला, तर डिसेंबर २०२२ पर्यंत मेट्रो पुण्यात धावण्याचे नागरिकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. वनाज- रामवाडी हा १४. ६५ किलोमीटरचा मार्ग संपूर्णतः एलिव्हेटेड पद्धतीने (रस्त्यावर खांब उभारून) होणार आहे. तर, पिंपरी-स्वारगेट १६ किलोमीटरच्या मार्गावर सुमारे ५ किलोमीटरचे अंतर भुयारी आहे. गेल्या तीन वर्षांत प्रकल्पाचे एकूण सुमारे ४० टक्के काम झाले आहे. तर, पुढील दोन वर्षांत ६० टक्के काम पूर्ण करण्याचे मेट्रो पुढे आव्हान आहे.

कोरोनामुळे लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात एप्रिल ते मे दरम्यान मेट्रोचे काम ३५ दिवस बंद होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू झाल्या. त्यामुळे मेट्रोमध्ये काम करणाऱ्या ५ हजार कामगारांपैकी फक्त ८०० जण पुण्यात राहिले होते. सध्या परिस्थितीत सुधारणा झाली असून सुमारे ३८०० मजूर कार्यरत आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम क्षमतेच्या सुमारे ६०-७० टक्केच सुरू आहे.

मेट्रोचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत विचारणा केली होती. त्यावेळी पिंपरी - फुगेवाडी मार्गाचे काम डिसेंबरअखेरीस तर, आनंदनगर- गरवारे महाविद्यालयाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन महामेट्रोने दिले आहे. 

ही कामे वेळेत पूर्ण करण्याची आव्हाने 

  • स्वारगेट येथील टान्स्पोर्ट हबचे काम दोन वर्षांत पूर्ण करणे
  • स्वारगेट चौकातील पादचारी भुयारी पूल  
  • शिवाजीनगर न्यायालयासमोरील मेट्रोची बहुमजली स्थानके
  • सिमला ऑफिस चौकातील पादचारी भुयारी मार्ग 
  • दोन्ही शहरांतील मेट्रोच्या २८ स्थानकांची कामे 
  • भुयारी मेट्रोची तीन स्थानके आणि मार्ग 

पुण्यातील ३१ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा सध्याचा वेग पाहता पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान महामेट्रोपुढे आहे. 
- विवेक गाडगीळ, माजी व्यवस्थापकीय संचालक, हैदराबाद मेट्रो

मेट्रो प्रकल्प नेमका केव्हा पूर्ण होईल, हे सध्या सांगता येणे अवघड आहे. प्रकल्पाला निधीची कमतरता नाही. मनुष्यबळाची समस्या असली, तरी काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com