आळंदीच्या वेशीवर कोरोना, अंगणात मात्र चिकुनगुणियाचे थैमान 

विलास काटे
शनिवार, 23 मे 2020

आळंदीतील प्रभाग आठमध्ये मात्र डेंगी व चिकुनगुणियाच्या संसर्गाने नागरिक त्रस्त आहेत. पन्नासहून अधिक नागरिक गेल्या चार दिवसांत विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदीच्या वेशीवर कोरोना थैमान घालत असताना आळंदीतील प्रभाग आठमध्ये मात्र डेंगी व चिकुनगुणियाच्या संसर्गाने नागरिक त्रस्त आहेत. पन्नासहून अधिक नागरिक गेल्या चार दिवसांत विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

बाप रे...बंधाऱ्यावरून नदीत कोसळला ट्रक, त्यात होते...  

आळंदीतील देहू फाटा परिसरात सध्या डेंगी आणि चिकुनगुणियाच्या आजाराने नागरिकांना ताप झाला आहे. भोसरी, मोशी, आळंदीतील विविध रुग्णालयात नागरिक उपचार घेत असून, अनेकांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तब्बल पन्नासहून अधिक नागरिक सध्या तापाच्या साथीच्या आजाराने त्रस्त असून एकाच कुटुंबातील तिन चार जणांना उपद्रव झाला आहे. 

मुलीकडून प्रेमाचे नाटक, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल  

देहू फाटा येथील नगरसेवक सचिन गिलबिले आणि माजी नगरसेवक दिनेश घुले यांच्या जवळच्या नातलगांनाच डेंगी आणि चिकुनगुणियाने त्रस्त केल्याने विषय ऐरणीवर आला. गिलबिले यांनी पालिका प्रशासनाच्या कानावर ही बाब सांगूनही अद्याप पालिकेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. याबाबत दिनेश घुले यांनी सांगितले की, तक्रार करूनही पालिका प्रशासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. डेंगीच्या मच्छरांचा वेळीच बंदोबस्त केला नाही; तर आणखी काही नागरिकांना उपद्रव होण्याची शक्‍यता आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या नावाखाली पालिकेतील कर्मचारी असून नसल्यासारखे आहे. मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्याकडे आळंदीबरोबरच चाकण पालिकेचा कारभार असल्याने त्यांचेही दुर्लक्ष आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत असल्याने प्रशासनावर नाराजी आहे. वेळेत कचरा न उचलल्याने मच्छरांची संख्या वाढली. शहरात धुरळणी यंत्राद्वारे जंतूनाशक पावडर आणि फॉगिंगची मागणी करूनही अद्याप पालिकेने धुरळणी केली नाही. साथीच्या रोगांचा वेगाने फैलाव होत असताना प्रशासन मात्र ढिम्म आहे, असा आरोप नगरसेवक सचिन गिलबिले यांनी केला आहे. 

देहू फाटा परिसरात घरोघरी जावून आरोग्य विभागाने सर्व्हे केला आहे. नागरिकांनी साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या सापडल्या. याबाबत पालिकेला कल्पना दिली. तसेच, नागरिकांनी पाणी साठवताना त्यावर झाकण ठेवावे. सध्या ग्रामीण रुग्णालयात तीस बेड उपलब्ध असून, तातडीची मदत देणे शक्‍य आहे. पालिकेने डासांचा बंदोबस्त करण्यासाठी फॉगिंग करणे अपेक्षित आहे. 
- डॉ. गणपत जाधव
वैद्यकय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, आळंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona at the entrance of Alandi, but Chikungunya's in the courtyard