धक्कादायक, शिरूरमधील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना 

शरद पाबळे
बुधवार, 8 जुलै 2020

आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीची बैठक आयोजित करून खबरदारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येत आहे.

कोरेगाव भीमा (पुणे) : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांचे काम समाधानकारक, शरद पवार यांनी थोपटली पाठ

याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी माहिती दिली की, कोरेगाव भीमा येथे १९ मार्चपासून ३६ दिवसांचा सर्वात मोठा लॉकडाउन घेतल्याने पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येच्या गावाला कोरोनापासून संरक्षित ठेवण्यास कृती समितीला यापूर्वी यश आले होते. मात्र, एक महिन्यापूर्वी कोरेगाव भीमा येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर पुन्हा सहा जुलै रोजी येथे एक कोरोनाबाधित आढळून आला आहे. 

मुंबईकर जावयाने उडवली दौंडजकरांची झोप

आरोग्य विभागाच्या वतीने या रुग्णाच्या संपर्कातील सात व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. आज त्या सात जणांचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले असून, सात जणांपैकी पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिरूर तालुक्यामध्ये एकाच वेळी एका घरातील जास्त व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची पहिलीच घटना कोरेगाव भीमा येथे घडली आहे. त्यामुळे कोरेगाव भीमासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीची बैठक आयोजित करून खबरदारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने या पाचही व्यक्तींच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेऊन उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणचा परिसर सील केला. तसेच, संपूर्ण गाव १४ दिवस बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तसेच, ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच योगेश गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी गाव निर्जंतुकीकरण केले. तसेच, गाव कामगार तलाठी अश्विनी कोकाटे, पोलिस पाटिल मालन गव्हाणे यांनी परिसराची पाहणी करून गावातील व्यवहार बंद ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to five members of the same family in Shirur taluka