कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांचे काम समाधानकारक, शरद पवारांनी थोपटली पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम समाधानकारक आहे. टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटली. पोलिस उपायुक्‍तांच्या बदल्यांच्या विषयात जे बोलले जाते, त्यात काहीच तथ्य नाही. ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने केल्या जातात. आमच्यात यावरून कोणताही वाद नाही, असे सांगून पवार यांनी त्यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.

पुणे - ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम समाधानकारक आहे. टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटली. पोलिस उपायुक्‍तांच्या बदल्यांच्या विषयात जे बोलले जाते, त्यात काहीच तथ्य नाही. ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने केल्या जातात. आमच्यात यावरून कोणताही वाद नाही, असे सांगून पवार यांनी त्यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यापारी असोसिएशनची बैठक आज पवार यांच्या उपस्थित झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘मुख्यमंत्र्यांना भेटायला पवार स्वतः जातात, आताही पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांच्या नाराजीमुळे ते चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर पोचले. पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत जाणे चांगले नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पवार यांच्यावर टीका केली होती. त्याकडे पवार यांनी 
दुर्लक्ष केले.

पुण्यात ६४० रुग्णांना कोरोनाचा संसर्ग; तर एवढे झाले कोरोनामुक्त

‘आमच्यामध्ये कोणतीही अस्वस्थता किंवा नाराजी नाही. राज्यासमोर जेव्हा काही प्रश्‍न निर्माण होतात, त्यावेळी आम्ही एकत्र बसून विचार करतो. त्यामुळे त्या भेटीत काही विशेष नाही. दुसऱ्या एका कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ गेलो होतो. त्यांच्याबरोबर माझ्या घरी बैठक करायची असेल, तर माझे घर तेथून १४ किलोमीटर अंतरावर आहे. त्याऐवजी जेथे मी गेलो, तेथून एका फर्लांगावर मुख्यमंत्र्यांचे घर असेल तर मला तेथे जाण्यात काहीच कमीपणा वाटत नाही. चंद्रकांत पाटलांना त्याची चिंता वाटत असेल, तर त्यावर माझे काहीही म्हणणे नाही,’’ असे सांगत पवार यांनी पाटील यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले.

'या' कार्यकर्त्याची श्रद्धा पाहून शरद पवारही झाले नि:शब्द!

पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हातात सत्ता घेतली, त्यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात गतीने पावले टाकण्यासंबंधीचा विचार केला होता. परंतु, कोरोनाचे संकट आल्यावर त्यांचा प्राधान्यक्रम बदलला. त्यामुळे बाकीची कामे थांबवावी लागली आणि कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये त्यांना लक्ष घालावे लागले. कोरोनाच्या विषयात मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दिवसातून १४ ते १५ तास बैठका होतात, हे मी पाहतो आहे. या बैठकांची आवश्‍यकताही आहेच. अशा काळात विरोधकांनी टीका टिप्पणी करू नये.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रमुखांनी बाहेर पडूच नये
मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नाहीत, अशी टीका वारंवार होते. त्यावर पवार म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्यांनी बाहेर पडणे म्हणजे लोक गर्दी करतात. त्यामुळे शक्‍यतो प्रमुख लोकांनी बाहेर पडूच नये, असे माझे मत आहे. त्यांना नागरिकांशी बोलायचे असेल तर अनेक साधने उपलब्ध आहेत. ज्याच्याकडे संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी असते, त्याने नेहमीच सावधपणे भूमिका घ्यायची असते. जी मुख्यमंत्री घेत आहेत. एखाद्या भूमिकेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्या प्रशासकाची असते, त्यावेळी त्याला दहावेळा विचार करावा लागतो.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar appreciate Maharashtra cm uddhav Thackeray work in covid pandemic