esakal | कोरोनामुक्त गाव योजनेत विद्यार्थी बजावणार ‘स्वयंसेवका’ची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनामुक्त गाव योजनेत विद्यार्थी बजावणार ‘स्वयंसेवका’ची भूमिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी आहात आणि कोरोनाच्या संकट काळात तुम्हाला अनेकांच्या मदतीला धावून जाण्याची इच्छा आहे का? अहो, मग इकडे नक्की लक्ष द्या. शासनाच्या ‘कोरोनामुक्त गाव’ योजनेत तुम्हाला ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा प्रशासन आणि भारतीय जैन संघटना यांनी पुढाकार घेतला आहे.

राज्य सरकार आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञांकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना, पुणे जिल्हा प्रशासन आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यामध्ये ‘कोरोनामुक्त गाव’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत सध्या काही गावांमध्ये काम सुरू आहे.

हेही वाचा: पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांचा एकच गणपती

गावपातळीवर ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन या योजनेचे जनचळवळीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे अपेक्षित आहे. यासाठी विद्यापीठाच्या पुणे विभागातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी-स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले आहे.

या स्वयंसेवक व प्राध्यापक यांची ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत योजनेची सविस्तर माहिती जाणार असून त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी प्राध्यापक व स्वयंसेवक यांना राज्य सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भारतीय जैन संघटना यांचे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेच्या वाघोली येथील महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेटून कोरोनामुक्त गाव योजनेबाबत, तसेच त्याअनुषंगाने कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

इच्छुक स्वयंसेवकांसाठी सूचना:

- महाविद्यालयाच्या परिसरातील किमान चार स्वयंसेवक प्रती गाव याप्रमाणे स्वयंसेवकांची निवड करण्यात येईल

- स्वयंसेवक हा पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असावा

- इच्छुक स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी/प्राध्यापक यांनी १४ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी

- नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/3cHUzz3cB8RcyCLV6

‘‘राज्य सरकारच्या ‘कोरोनामुक्त गाव’ योजनेतंर्गत प्रत्येक गावात पाच ‘टास्क फोर्स’ करण्यात येत आहेत. ‘टास्क फोर्स’ला दिलेल्या कामाचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक मदत करणार आहेत.’’

- डॉ. संजय गायकवाड, समन्वयक

loading image
go to top