esakal | बारामतीच्या ग्रामीण भागाने असा रोखला कोरोना... 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामती तालुक्यात आजअखेर कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे सव्वाशेच्यावर पोचला आहे. मात्र, तालुक्यातील ९९ पैकी ७८ ग्रामपंचायती अद्याप कोरोनामुक्त आहेत.

बारामतीच्या ग्रामीण भागाने असा रोखला कोरोना... 

sakal_logo
By
जयराम सुपेकर

सुपे (पुणे) : बारामती तालुक्यात आजअखेर कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे सव्वाशेच्यावर पोचला आहे. मात्र, तालुक्यातील ९९ पैकी ७८ ग्रामपंचायती अद्याप कोरोनामुक्त आहेत. तालुक्याच्या पश्चिम दुष्काळी पट्ट्यातील सुपे व परिसरातील २१ गावांचा कोरोनामुक्त गावात समावेश आहे. प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य, पोलिस, शिक्षक व काही ग्रामदुतांनी गावाच्या वेशीवर दक्ष पहारा दिल्याने या गावातील नागरिक कोरोना संकटापासून आजही सुरक्षित आहेत.

खडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी साठा

मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत मोरगाव ते खराडवाडी, सुपे, काऱ्हाटीसह २१ गावांत मिळून सुमारे ४२ हजार लोकसंख्येच्या गावात अद्याप कोरोनाबाधित रूग्ण सापडला नाही. तर, तालुक्यातील सुप्यासह ७८ गावे अद्याप कोरोनामुक्त आहेत. तालुक्यातील २१ गावांमध्ये कोरोनाबाधित सापडले आहेत. सध्या ग्रामिण भागात बाधिताची वाढती संख्या आहे. काही गावातून काही संशयीत रूग्ण आढळून आले होते. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता, अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. ए. पी. वाघमारे यांनी दिली. 

बारामतीत कोरोनाचा बारावा बळी

सुपे गाव बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सिमेवर आहे. मध्यवर्ती बाजार पेठेचे हे ठिकाण असल्याने तीनही तालुक्यातील सुमारे २५-३० गावांतील लोकांचा येथे वावर असतो. येथील व्यापारी, छोटे व्यावसायीक, दुकानदार मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून काळजी घेताना दिसतात. मात्र, अनेकदा सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे चित्र दिसते. ही काळजी घेतली, तर भविष्यातही सुपे व परिसरातील गावे कोरोनामुक्त राहतील, असे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यावसायिकांनी आलेल्या ग्राहकाचे नाव, गाव व मोबाईल क्रमांक लिहून ठेवण्याविषयी दुकानदारांना यापूर्वीच कळवल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली. गावातील १० वर्षाच्या आतील व ६० वर्षाच्या पुढील नागरिकांच्या आजाराची यादी शिक्षक व आंगणवाडी कार्यकर्त्यांनी तयार केल्याचे त्यांनी सांगतिले. दरम्यान, मोरगाव प्राथमिक केंद्रातील आरोग्य कर्मचारी अरविंद चव्हाण, तानाजी कांबळे, वैशाली बारवकर, ग्रामपंचायत कर्मचारी भगवान सकट आदींनी केलेल्या सर्वेक्षणात सुप्याच्या कुंभारआळीतील एका बंद घरासमोरील पाण्याच्या टाकीत डेंगीच्या लारवा आढळून आल्या. यावर तातडीने उपाययोजना करून लारवा नष्ट करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगतिले. 

कुठलाही आजार सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका. सौम्य लक्षणे आढळली तर लवकर उपचार होतो. भीतीचे वातावरण निर्माण होत नाही. जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. निष्काळजीपणा करू नका. १० वर्षाच्या आतील  व ६० वर्षाच्या पुढील नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. समतोल ताजा, चांगला आहार घ्या. झोप चांगली घ्या, असा सल्ला डॉ. खोमणे व डॉ. वाघमारे यांनी दिला आहे. बाहेर गावाहून कोणी आले का, बाधिताच्या संपर्कात कोणी आले असेल, तर आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.