धक्कादायक, माउलींच्या पादुकांसोबत जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला कोरोना

विलास काटे
सोमवार, 29 जून 2020

उद्या माउलींच्या पादुका वीस वारक-यांसोबत पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. संबंधित पोलिस अधिकारी पुणे जिल्ह्याच्या नीरा येथील हद्दीपर्यंत पादुकांना पोचविण्यासाठी सोबत जाणार असल्याने त्यांचीही टेस्ट केली. 

आळंदी (पुणे) : खेड तालुक्यातील आळंदी येथील एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पिंपरी चिंचवडमधील खासगी रूग्णालयात ते उपचार घेत आहेत. ते माउलींच्या पादुकांसोबत जाणार होते. त्यांच्यासोबत वीस पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत.  

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

याबाबत आळंदी पालिकेचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले की, संबंधित अधिकारी लॉकडाउन जाहीर झाल्यापासून आळंदीत विविध ठिकाणी भेट देत होते. उद्या माउलींच्या पादुका वीस वारक-यांसोबत पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमिवर वारक-यांची कोरोना टेस्ट केली. संबंधित पोलिस अधिकारी पुणे जिल्ह्याच्या नीरा येथील हद्दीपर्यंत पादुकांना पोचविण्यासाठी सोबत जाणार असल्याने त्यांचीही टेस्ट केली.

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

या सर्वांच्या चाचण्या शनिवारी (ता. २७) केल्या होत्या. त्यामध्ये आज कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निदान झाले. तर, वारक-यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संबंधित अधिका-यांना उच्च पातळीवरील मधुमेहही आहे. त्यामुळे अधिक काळजी घेतली जात आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या आळंदी पोलिस ठाण्याच्या वीस पोलिस कर्मचा-यांचीही तपासणी करण्याचे काम सुरू आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

पोलिस अधिकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे आता आळंदीतील परिसरात अधिक दक्षता घेतली जात आहे.आळंदी मंदिर परिसर आणि पोलिस ठाण्याकडे येणारे मार्ग सील केले जाणार आहेत. मंदिराकडे येणा-या सर्व रस्त्यांवर बॅरिगेटिंग केले जाणार आहे. उद्या पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे आज रात्रीपासून आळंदी पोलिस ठाणे आणि माउली मंदिर परिसर सील करणार असल्याची माहिती आळंदी पालिका मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी दिली.

दरम्यान, स्वतः मुख्याधिकारी समीर भूमकर हेही पोलिसांच्या सातत्याने संपर्कात येत होते. त्यामुळे त्यांनीही स्वतःहून कोरोना टेस्टसाठी सॅम्पल दिले असून, अहवालाची प्रतिक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of Alandi police officer positive