धक्कादायक, पुण्यातील या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे चार तालुक्यात पसरला कोरोना 

किरण भदे
मंगळवार, 30 जून 2020

कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कंपनीतील कामगार कोरोनाबाधित होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. एक कामगार बाधीत आढळल्यानंतर तातडीने कंपनी बंद करणे गरजेचे असताना कोणालाच माहिती न देता व्यवस्थापनाने कंपनी चालु ठेवली.

नसरापूर (पुणे) : भोर तालुक्यातील वरवे येथील एका कंपनीमध्ये पुणे येथे राहणारा एक कामगार करोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने केलेल्या इतर कामगारांच्या तपासणीत सात कामगार कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामध्ये भोर तालुक्यातील चार 
आणि पुरंदर, हवेली व वेल्हे तालुक्यातील प्रत्येकी एक कामगार असून, प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहीती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

वरवे येथील खासगी कंपनीमध्ये 25 जून रोजी पुणे (हडपसर) येथून येणाऱ्या कामगारास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने कंपनी बंद न करता चालू ठेवली होती व संबधीत कामगाराची माहिती प्रशासनास दिली नव्हती. याबाबत 28 जून रोजी माहिती मिळाल्यावर भोरच्या तहसीलदारांनी 29 रोजी कंपनीस भेट दिली. त्यानंतर कंपनी बंद करण्यास सांगितले. तसेच, कंपनीमधील इतर कामगारांची तपासणी करण्याची सुरुवात आरोग्य विभागाने केली. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

या तपासणीमधून कोरोनाबाधित कामगाराच्या संपर्कात आलेल्या 100 जणांना होम क्वारंटाइन केले आहे. तसेच, त्रास होणाऱ्या 18 कामगारांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते. त्यामधील 16 कामगारांचे अहवाल आज प्राप्त झाले असून, दोन अहवाल प्रलंबीत आहेत. 16 मधील सात कामगार कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

सात बाधीत कामगारांमध्ये भोर तालुक्यातील साळवडे, शिवरे, वरवे खुर्द व खडकी या गावामधील प्रत्येकी एक कामगार असून, पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथील एक, वेल्हे तालुक्यातील आंबवणे येथील एक व हवेली पुणे येथील आंबेगाव य़ेथील एक, असे सात कामगार कोरोना बाधीत आहेत. त्यांच्यावर उपचार चालू असून, सर्वांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यकांत करहाळे यांनी दिली आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर येथील एक रुग्ण बरा झाला आहे. त्यामुळे महामार्ग पट्ट्यात आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला नव्हता, परंतु हडपसर येथील कामगाराच्या कंपनीमधील संपर्कामुळे महामार्ग पट्ट्यातील चार गावांमध्ये एकाच वेळी कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभागाची व प्रशासनाची चिंता वाढली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

वरवे येथील कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कंपनीतील कामगार कोरोनाबाधित होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. एक कामगार बाधीत आढळल्यानंतर तातडीने कंपनी बंद करणे गरजेचे असताना कोणालाच माहिती न देता व्यवस्थापनाने कंपनी चालु ठेवली. त्यामुळे बाधीत रुग्णाने वापरलेले साहित्य, हत्यारे, स्वच्छतागृह, यामधून देखिल संसर्ग वाढला असण्याची शक्यता आहे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona spread to four talukas due to the negligence of the company in Bhor