esakal | कोरोना रुग्णांच्या सुविधांसाठी आमदार फंडातील एक कोटी खर्च करणार : अतुल बेनके
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

कोरोना रुग्णांच्या सुविधांसाठी आमदार निधीतील एक कोटी खर्च करणार : अतुल बेनके

sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : सर्व पक्षीय जिल्हा परिषद व पंचायत सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधुन कोरोना रुग्णांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आमदार फंडातील एक कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. आमदार बेनके म्हणाले, ''राज्यात कोरोनाचे संकट तीव्र होत आहे. गेले काही दिवस ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमेडिसिवीर, ऑक्सिजनची देशात टंचाई निर्माण झाली आहे. जुन्नर तालुक्यात वाढत चाललेला मृत्यू दर चिंताजनक आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे मनाला वेदना होत आहेत. कोरोना रुग्णांना तातडीने उपचार सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सुद्धा काटेकोरपणे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.''

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

उपचार सुविधांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, विघ्नहरचे अध्यक्ष शेरकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, अंकुशशेठ आमले, मोहित ढमाले, देवरामजी लांडे, आशा बुचके, गुलाब पारखे, जुन्नर नगर परिषदेचे अध्यक्ष शामराव पांडे, सभापती विशाल तांबे आदीनी सहभाग नोंदवला. आमदार बेनके म्हणाले कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लेण्याद्री व ओझर येथिल शासकीय कोविड उपचार केंद्रात ५३० साधे बेड आहेत. अत्यावश्यक रुग्णांसाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात २५ बेड असून या ठिकाणी २७ रुग्णावर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा: नारायणगाव : कोरोनाचे उपचार न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

२१ खाजगी कोविड उपचार केंद्रात १५५ साधे बेड , २९० ऑक्सिजन बेड,१० व्हेंटिलेटर बेड व ५६ आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत साधे बेड उपलब्ध आहेत मात्र अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्सिजन युक्त बेड, व्हेंटिलेटर व आयसीयु बेड उपलब्ध होत नाहीत.या मुळे तातडीने शिरोली बुद्रुक येथे आज पासून कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले. या मध्ये तीस ऑक्सिजन , दहा साधे व पाच व्हेंटिलेटर बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. शिरोली बुद्रुक कोरोना केअर सेंटरसाठी आमदार फंडातुन दोन व्हेंटिलेटर, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्याशील शेरकर यांनी दोन व्हेंटिलेटर तर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी एक व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय आज घेतला आहे. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रास मोनिकाताई महाबरे यांनी ५ लाख २९ हजार १८६ रुपये किंमतीचे तर शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्थेने १ लाख ८२ हजार ९०० रुपये किंमतीचे साहित्य भेट दिले.

कोरोना रुग्णांना या संकटांतून बाहेर काढण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्रुटी सुधारण्याचे प्रामाणिकपणे काम सुरू आहे. संकट मोठे असुन संकटकाळात टीका टिप्पणी न करता राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन मदत करावी, असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.