esakal | Corona Update - पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यातील आकडेवारी दिलासादायक
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 test swab

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग आता मंदावला असून राज्यातील आकडेवारी दिलासादायक अशी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 16 लाख 87 हजार 784 रुग्ण सापडले असून 44 हजार 703 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Corona Update - पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यातील आकडेवारी दिलासादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग आता मंदावला असून राज्यातील आकडेवारी दिलासादायक अशी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 16 लाख 87 हजार 784 रुग्ण सापडले असून 44 हजार 703 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 15 लाख 24 हजार 304 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये आढळल्याचं दिसून येत आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये राज्याच्या तुलनेत मृत्यूदर जास्त आहे. या चार जिल्ह्यात सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे. आरोग्य विभागाचे संचालक सतिश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यात कोरोनाचा Peak येऊन गेला आहे. सप्टेंबर महिन्यात या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण होते. मात्र दिलासा देणारी एक बाब म्हणजे पुणे, मुंबईसारखा कोरोनाचा उद्रेक याठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं नाही. याला अनेक कारणं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे-मुंबईतील लोकसंख्येची घनता. सुरवातीला या दोन शहरांमध्ये कोरोना पसरला. याठिकाणचे लोक गावी जायला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील इतर भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. 

सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांपैकी कोल्हापूरचा रिकव्हरी रेट सर्वाधिक 94.04 टक्के इतका आहे. त्याखालोखाल सांगली (90.61), सोलापूर (98.28)  आणि सातारा (87.65) यांचा क्रमांक लागतो. रिकव्हरी रेट दिलासादायक असला तरी कोल्हापूरचा मृत्यूदरही जास्त आहे. याशिवाय एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत साताऱ्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो.  

हे वाचा - कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासनाची तयारी : सौरभ राव

रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोल्हापूरमध्ये एकूण 47 हजार रुग्ण आढळले. त्यापैकी सध्या सक्रीय रुग्ण 1207 इतके आहेत. 9 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक 10 हजार सक्रीय रुग्ण होते. तर साताऱ्यात आतापर्यंत 47 हजार 753 रुग्ण सापडले  असून सध्या 4484 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 17 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण होते. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 46 हजार 965 कोरोनाबाधित सापडले असून जिल्ह्यात 19 सप्टेंबरला सर्वाधिक 10 हजार सक्रीय रुग्ण होते. 

गेल्या तीन ते चार आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमधील परिस्थिती सुधारत आहे. साताऱ्यात गेल्या दहा दिवसांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. तर सोलापूरमध्येही रुग्णवाढीचा दर कमी आहे. कोल्हापूर आणि सांगलीतही अशीच परिस्थिती आहे.

loading image
go to top