‘कोरोना’त घडले पुणेकरांतील समंजसपणाचे दर्शन

Dr Ravindra Shisave
Dr Ravindra Shisave

पुणे - ‘पुणे शहर कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असल्याने पुणेकरांना लॉकडाउनमध्ये जाचक अटींना सामोरे जावे लागले. पोलिस रस्त्यांवर कडक बंदोबस्त करीत असतानाच दुसरीकडे लोकांना मदतीचा हातही देत होते. हीच प्रतिमा मनात बसल्याने पुणेकरांनी पोलिसांच्या कडक कारवाईला मुळीच विरोध केला नाही. यातूनच पुणे शिक्षणात पुढे आहे, तसेच समंजसपणा व सौजन्यातही पुढे असल्याचे दिसले.’ असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बुधवारी सांगितले. 

कोरोना काळात लोकांच्या मनात पोलिसांबद्दल तयार झालेली प्रतिमा भविष्यातही टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार दिनाच्यानिमित्ताने पोलिस सहआयुक्त डॉ. शिसवे यांनी ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट देत उपस्थितांशी संवाद साधला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना काळातील पोलिसांच्या कामाबद्दल डॉ. शिसवे म्हणाले, ‘‘कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पहिल्या लॉकडाउनपासून पुणेकरांना जाचक अटींना सामोरे जावे लागले. त्यामुळे सुरवातीला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश आले. बंदोबस्तावर असताना पोलिस लोकांना विविध प्रकारे मदत करीत होते. त्याचा अनुभव पुणेकर घेत होते. त्यामुळेच नंतर रमजान, गणेशोत्सव अशा विविध सणांच्यावेळी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला  नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुणेकरांकडून आम्हालाही खूप काही शिकता आले. दुर्दैवाने, या कालावधीत आमच्या १२ पोलिसांना जीव गमवावे लागले.’’

मालमत्तासंबंधीच्या गुन्ह्यात कमी
पोलिसांकडून सगळ्याच पातळीवर काम केले जाते. घरफोड्या, सोनसाखळी व वाहनचोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. विशेषतः गत वर्षीच्या तुलनेत २०२०मध्ये मालमत्तेसंबंधीचे गुन्हे ४९ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. वाहनचोरीच्या मोठ्या टोळ्यांना अटक करून ३५ टक्के गुन्हे कमी केले. सोनसाखळी चोरीच्या ४९ घटना घडल्या, त्यापैकी ३५ गुन्ह्यांचा शोध लावला आहे. गंभीर गुन्हे घडू नयेत, यासाठी ४१३ सारख्या कलमाचा समावेश करून गुन्हेगार कारागृहातून बाहेर पडू नयेत, अशी व्यवस्था केल्याचे डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले.

जनसंपर्क महत्त्वाचाच
पोलिसांचा जनसंपर्क जास्तीत जास्त पाहिजे. आपल्याकडे विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी आपण जोडले, गेल्यास त्या व्यक्तीला आनंद होतोच, शिवाय आपल्याही कामात त्याचा उपयोग होतो. म्हणूनच आम्ही साडे पाच हजार पोलिसांना ‘भावनिक प्रज्ञावंत’चे धडे दिले. त्यातून त्यांच्यात चांगले बदल घडले असून ते नागरिकांशी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधत असल्याचे सध्याची स्थिती असल्याचे शिसवे यांनी सांगितले.

रात्रगस्तीवरील पोलिसांच्या कामाची बारकाईने नोंद
औंध येथील चोरीच्या घटनेतील पोलिसांच्या बेजबाबदार वागणुकीची आम्ही गांभीर्याने दखल घेत संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाईही केली. हा प्रकार अतिशय लाजिरवाणा होता. त्याची सखोल चौकशीही सुरू आहे. भविष्यात असे घडू नये, यासाठी म्हणूनच रात्रगस्तीवरील पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सर्वंकष कार्यपद्धती आम्ही तयार केली आहे. त्यानुसारच, रात्रगस्तीवरील पोलिसांच्या कामावरील प्रत्येक घडामोडींची बारकाईने नोंद ठेवली जाईल. त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com