बाप्पाच्या दारी पुन्हा चोरी; मंडईच्या श्री शारदा गजानन मंदिरातून २५ तोळं सोन्याचे दागिने लंपास

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.   

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या मंदिरात गुरुवारी मध्यरात्री चोरट्याने श्री शारदा गजाननाच्या मूर्तीवरील पंचवीस तोळ्यांची सोन्याची दागिने चोरुन आभुषणे नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच मंडईतील व्यापारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मंदिर परिसरात गर्दी केली.

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घ्या : अजित पवार​

दिवस-रात्र माणसांच्या गर्दीने मंडई परिसर गजबजलेला असतो. विशेषत: श्री शारदा गजानन मंदिर परिसरात माणसांची सातत्याने वर्दळ असते. असे असुनही गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास एक चोरटा श्री शारदा गजानन मंदिरात शिरला. चोरट्याने मंदिरातील सभामंडपाकडे जाणाऱ्या मागील बाजुचा दरवाजा कटावणीने उचकटला. त्यानंतर सभामंडपातील शारदा-गजाननाच्या मूर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसूत्र अशी पंचवीस तोळ्यांची सोन्याची दागिने चोरली. चोरी केल्यानंतर चोरटा परिसरात काही काळ घुटमळल्याचे तसेच मंदिराच्या मागील बाजूस गेल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

दरम्यान, मंदिरात नित्यपूजेसाठी सकाळी पुरोहित आल्यानंतर मूर्तीवरील आभुषणे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, पदाधिकारी संजय मते यांना दिली. ही खबर सर्वत्र पसरताच मंडळ कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली.

पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; पाहा कोठे कोठे झाला पाऊस

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी घटनास्थळी भेट दिली. मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. याप्रकरणी पुरोहित श्रीपाद कुलकर्णी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत, असे पोलीस निरीक्षक टिकोळे यांनी सांगितले.  

श्री शारदा गजाननाच्या मंदिरात 2015 मध्ये चोरी झाली होती. त्यावेळी जवळपास एक कोटी रुपयांची आभुषणे चोरीला गेली होती. पोलिसांनी या गुन्ह््याचा तपास करून दोन दिवसात आरोपीला पकडले होते. त्यानंतर आम्ही सुरक्षिततेच्या पूर्ण उपाययोजनाही केल्या. त्यानंतरही अशी घटना घडली आहे.पोलिसांकडुन कसुब प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे ‘श्रीं’ची आभुषणे पुन्हा मिळतील, असे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यानी सांगितले.

यंदा महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा होणार; पण...​

"मंदिरात पाच वर्षांपूर्वी चोरी झाली होती. त्यावेळी मंदिरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मंदिरातील काचेचे दरवाजे, खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसविल्या होत्या. मंदिरात रात्रपाळीत रखवालदाराची नेमणूकही केली आहे. लॉकडाऊनमध्ये रखवालदार मूळगावी गेला. त्यामुळे चोरट्याने पाळत ठेवून चोरी केल्याचे दिसत आहे."
- अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jewellery Theft at Pune Shri Shaarda Gajanan Temple

Tags
टॉपिकस
Topic Tags: