पुण्यातील या गावात आठवड्यात कोरोनाचा तिसरा बळी 

दत्ता जाधव
Wednesday, 16 September 2020

नागरिकांनी सतर्कता बाळगत कोरोनाची कुठलीही लक्षण आढळल्यानंतर दुखणे अंगावरती न काढतात त्वरित याबाबतची कल्पना प्रशासनास देऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

माळशिरस (पुणे) : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टेकवडी येथे कोरोनाचा या आठवड्यातील तिसरा बळी गेला. गावातील एका 55 वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचार घेत असतानाच मृत्यू झाला.  

मोदी सरकारने शेतकऱ्यांना रडवलेच

टेकवडी येथे दोन महिन्यांपूर्वी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  सापडला. त्यानंतर ते उपचार घेऊन बरे झाल्यानंतर गाव पूर्णतः कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आठवड्यापूर्वी गावातील इंदलकर वस्ती येथील एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरोनाची लक्षणे आढळून देखीलही दोन-तीन दिवस उपचार न घेता घरीच दुखणे अंगावर काढले. त्यामुळे उशिरा रुग्णालयात दाखल केल्यानंतर या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.  त्यानंतर गावातील आठ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. दरम्यान, तीन दिवसापूर्वी इंदलकर वस्ती येथील 60 वर्षे वयाच्या व्यक्तीचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर काल गावातील एक 55 वर्षे महिलेला कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे सासवड येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. 

यंदा अधिक मासावरही कोरोनाचे संकट, जावईबापूंचा हिरमोड

दरम्यान, गावातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर तरकारी विक्रीसाठी हडपसर येथील शेवाळवाडी मार्केट येथे जात असतात. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडल्यावर झाला असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. नागरिकांनी सतर्कता बाळगत कोरोनाची कुठलीही लक्षण आढळल्यानंतर दुखणे अंगावरती न काढतात त्वरित याबाबतची कल्पना प्रशासनास देऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. गावातील सर्व व्यवहार सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य कर्मचारी व शिक्षक यांनी गावातील सर्व कुटुंबाचा सर्वे केला असून, शनिवारी (ता . 19) गावात शिबिर घेऊन गावातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's third victim in a week in Tekwadi village in Purandar taluka