मोठी बातमी : महाराष्ट्रानं कोरोनाला केलाय क्लस्टरमध्ये बंदीस्त

Coronavirus
Coronavirus

पुणे - राज्यातील कोरोनाच्या नव्याने सापडणारे ९० टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधून आहेत. राज्यातील इतर भागातून पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन आठवड्यांच्या तुलनेत कमी झाल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदविण्यात आले. राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दहा हजारांवर पोचली आहे. राज्यातील पहिली रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर ५१ दिवसांनी राज्यात दहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या ५१ दिवसांपूर्वी कोरोनाच्या सुरू झालेल्या उद्रेकाची सद्यःस्थिती `सकाळ`ने आरोग्य खात्याकडून जाणून घेतली. त्यात हा निष्कर्ष नोंदविला. 

कोरोना हॉटस्पॉट पुरताच
राज्यात सुरुवातीला पुणे - मुंबईसह यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आठ आठवड्यांपूर्वी दिसत होते. सध्या राज्यात ३३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. पण, इतर जिल्ह्यांमधील कोरोनाचा फैलाव टप्प्या-टप्प्याने नियंत्रित होतोय. जिल्ह्यांमध्ये नवीन हाँटस्पाँट तयार होत नाहीत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढळणारे रुग्ण हे त्याच हाँटस्पाँटमधील आहेत, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. 

का पसरला नाही कोरोना?
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या. शहरांतर्गत भाग सील केले. उद्रेक झालेली ठिकाणे, सर्वाधिक रुग्णसंख्येची ठिकाणे निश्चित केली. त्या भागात निर्जंतूकीकरण आणि सोशल डिस्टसिंगमुळे शहरांच्या इतर भागात कोरोना पसरला नाही. 

पुण्या-मुंबईतील आव्हान
राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या दोन शहरांमध्ये सुरुवातीला सोसायट्यांच्या भागात रुग्ण आढळले. पुण्यात सिंहगड रस्ता, कोरेगाव पार्क येथे रुग्णांचे निदान झाले. त्यानंतर चौथ्या आठवड्यापासून कोरोनाचे हाँटस्पाँट शहरातील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात स्थलांतरित झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती त्याच भागातून आहे. या दोन शहरांमधून रोज ९० टक्के नवीन रुग्णांचे निदान होते. 

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना
राज्यात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडल्या ठिकाणी केंद्राच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६६४ कंटेनमेंट झोन आहेत. त्यात नऊ हजार ३६१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३८.३० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

देशातील २९ टक्के रुग्ण महाराष्ट्रात
देशात केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर सलग चार आठवडे एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान येथे नवीन रुग्णांची संख्या वाढल्याने देशात आता ३१ हजार ६३५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ९ हजार ३१८ रुग्ण (२९ टक्के) एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तर, सुमारे ४० टक्के रुग्णांचा मृत्यू (४००) या राज्यात झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com