पुणेकरांनो शहरात कोरोनाची टक्केवारी घटणार; पण खबरदारी घ्यावीच लागणार

टीम ई-सकाळ
Wednesday, 14 October 2020

कोरोनामुक्‍त रुग्णांकडून 28 दिवसांनंतर प्लाझमा दान करण्यात येत आहे. असे आठ हजार युनिटस प्राप्त झाले आहेत.

पुणे : पुणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण 15 ते 16 टक्‍क्‍यांवर आहे. पुढील आठवड्यात ते दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी होईल. जिल्ह्यात ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या दोन महिन्यांपूर्वी 860 होती. त्यात घट होऊन 465 इतकी झाली आहे. हे समाधानकारक चित्र असले तरी, पुढील काळात खबरदारी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. 

आणखी वाचा - पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहतूक काही काळ बंद

राव म्हणाले, पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या टक्‍केवारीत घट होत आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात बाधित रुणांचे प्रमाण 15 ते 16 टक्‍के इतके आहे. तर, सातारा जिल्ह्यात 17 ते 18 टक्‍क्‍यांवर आले आहे. 
पुणे विभागात दोनशे व्हेंटिलेटर्स बेड्‌स रिक्‍त आहेत. त्यात पुणे महापालिका क्षेत्रातील शंभर बेड्‌सचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त रुग्णांकडून 28 दिवसांनंतर प्लाझमा दान करण्यात येत आहे. असे आठ हजार युनिटस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सध्या 750 युनिटस उपलब्ध आहेत. बाधित रुग्णांसाठी आवश्‍यक असलेले रेमडेसिव्हीर इंजक्‍शन आणि ऑक्‍सिजनचा पुरेसा कोटा उपलब्ध असून, स्थिती नियंत्रणात आहे. 

आणखी वाचा - पुणेकरांनो सावधान, डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट

रुग्णालयांसोबतचे करार 30 टक्‍क्‍यांवर
नायडू रुग्णालयाच्या बांधकामाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यावेळी गरज भासल्यास रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात येईल. बेड्‌स रिक्‍त असल्यामुळे खासगी रुग्णांलयांसोबत केवळ 30 टक्‍के करार नव्याने करण्यात आले आहेत. कोरोना चाचणीच्या काही सदोष किटस्‌मुळे चाचण्या सदोष झाल्या असतील तर, त्याचा शोध घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid patients rate will decrease divisional commission saurav rao