पुणेकरांनो सावध राहा; डिसेंबर-जानेवारीत येणार कोरोनाची दुसरी लाट!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

प्रशासनाकडून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'च्या दुसऱ्या टप्प्याला बुधवार (ता.१४)पासून सुरवात झाली. पुढील दहा दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. पीएमपीएलच्या तीनशेपेक्षा जास्त बसेसवर जनजागृती संदेश देण्यात येणार आहे.

पुणे : पुण्यासह देशभरात डिसेंबर, जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. दुसरी लाट तुलनेत किती प्रभावी असेल, हे सांगता येणार नाही. ही संभाव्य स्थिती टाळण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. परंतु नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वत:ला सुरक्षित ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी बुधवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत दिली. 

मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचा तडकाफडकी राजीनामा​

राव म्हणाले, हिवाळ्यात बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढते. तसेच, दसरा, दिवाळी, ख्रिसमस या सणासुदीच्या काळात गर्दी होण्याची शक्‍यता असते. बाजारपेठांसह हॉटेल्स, बार खुले झाले असून, सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

प्रशासनाकडून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'च्या दुसऱ्या टप्प्याला बुधवार (ता.१४)पासून सुरवात झाली. पुढील दहा दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. पीएमपीएलच्या तीनशेपेक्षा जास्त बसेसवर जनजागृती संदेश देण्यात येणार आहे. पुणे विभागात पहिल्या टप्प्यात सर्वेक्षणाचे काम 94 टक्‍के पूर्ण झाले आहे. विभागात 70 हजार संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात 14 हजारपेक्षा जास्त पॉझिटिव्ह कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच, 'पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार' अभियान राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सर्वदूर पोचविण्याचा प्रयत्न आहे. मास्क न घालणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून 11.50 कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे राव यांनी सांगितले. 

Positive Story : शेतकऱ्यांच्या हाकेला धावून आला जिल्हाधिकारी; धान्याला मिळवून दिला योग्य भाव!​

हॉटेल, बारमध्ये सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक 
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बिअर बारवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. हॉटेल, बिअर बारमध्ये स्वयंशिस्त राहत नाही. जेवण करताना मास्क काढावा लागतो. त्यामुळे ग्राहकांच्या टेबलमधील अंतर राखण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी जायचे की नाही, याबाबत नागरिकांनीच स्वत: ठरवणे गरजेचे आहे, असे राव यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second wave of corona is expected in December and January across the country including Pune