पुणे : विवाहाचा स्वागत समारंभ आला पित्याच्या अंगलट 

रवींद्र पाटे
Sunday, 29 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ दणक्यात आयोजित  करून सोशल डिस्टन्सच्या नियमाचा फज्जा उडवल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वर पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नारायणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ दणक्यात आयोजित  करून सोशल डिस्टन्सच्या नियमाचा फज्जा उडवल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वर पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.या मुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ वर पित्याच्या अंगलट आला आहे.कार्यमालकावर गुन्हा दाखल होण्याची या भागातील ही तिसरी घटना आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी अकबर मगन तांबोळी( वय ६५, राहणार नारायणगाव तालुका जुन्नर) यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डी. के.गुंड यांनी दिली.

या बाबत गुंड म्हणाले, ''दिवाळी नंतर पुणे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या मुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी आदेश जारी केला आहे. त्या नुसार लग्न समारंभ व इतर घरगुती कार्यक्रमात पन्नास पेक्षा जास्त जनांचा समावेश करणे बेकायदेशीर आहे.

या बाबतच्या सूचना हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय मालक, चालक यांना देण्यात आल्या आहेत. मात्र कार्यक्रम साजरे करत असताना सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन केले जात नाही. येडगाव व परिटवाडी येथील विवाह सोहळ्यामूळे वधु, वर पित्यासह सुमारे दिडशे जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे वधूच्या आजीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन्ही विवाह  सोहळ्यातील कार्यमालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं 

या मुळे प्रशासनावर मोठा ताण आला होता. ही घटना ताजी असतानाच २८ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री अकबर तांबोळी यांनी मुलाच्या विवाहानिमित्त स्वागत समारंभा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वागत समारंभ कार्यक्रमात सुमारे सत्तर पेक्षा जास्त पुरुष व स्त्रिया  सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता सामाजिक आंतर न राखता एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा करीत असल्याचे आढळून आले. या मुळे मानवी जीवितास धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरण्याचा संभव असल्याने तांबोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष दत्तात्रय साळुंके यांनी फिर्याद दिली.

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against Navradeva's father for not following the rules