अमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

लॉकडाऊनच्या काळात गेरा बिल्डर्स यांन शेंडगे याने फोन केला. खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला.

पुणे : खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करुन लॉकडाउन काळात एका बांधकाम व्यावसायिकाला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. विशाल अरुण शेंडगे (वय ३२, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सुरेश बंडु कांबळे (रा. गंज पेठ) याचा पोलीस शोध घेत आहेत. शेंडगे याने यापूर्वी आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फोन करुन अनेकांची फसवणूक केली होती. त्यांच्याविरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल आहेत. त्यात तो जामीनावर सुटला होता.

शेतकरी आंदोलनाला गालबोट लावणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?

याबाबत गेरा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहितकुमार गेरा (रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात गेरा बिल्डर्स यांन शेंडगे याने फोन केला. खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. फोन केलेल्या व्यक्तीबाबत शंका आल्याने गेरा यांनी चौकशी केली असता त्यांना खासदार कोल्हे यांनी फोन केला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार​

तक्रार अर्जाची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी केली जात होती. त्यावेळी कोल्हे यांच्या नावाने फोन करणारी व्यक्ती शेंडगे असल्याचे समोर आले. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी विनोद साळुंखे आणि अमोल पिलाने यांच्या पथकाने शेंडगे याला पकडले. शेंडगे याला त्याचा साथीदार कांबळे हा फोन करण्यासाठी सीमकार्ड पुरवत असल्याचे तपासातून समोर आले आहे. शेंडगे हा चोरीचा फोन व सीमकार्डचा वापर करून त्याच्यावरून नागरिकांना आमदार व खासदार यांच्या नावाने फोन करत असल्याचे समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime branch arrested a man who deceive by name of MP Amol Kolhe