esakal | शेतकरी आंदोलनाला गालबोट लावणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

Deep_Sidhu

लाल किल्ला आणि एकूणच दिल्लीमधील बहुतांश भागात जमाव गेला कसा आणि हा जमाव बराच वेळ लाल किल्ल्यावर हुल्लडबाजी करत असतानाही पोलिसांनी कारवाई का केली नाही?

शेतकरी आंदोलनाला गालबोट लावणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू याने प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी जमावाचे नेतृत्व केले आणि शेतकरी संघटना तसेच तरुणांना भडकविल्याचा आणि शीखांचा धार्मिक ध्वज फडकवण्याकरता उद्युक्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 'निशाण साहीब' फडकवल्यानंतर जमावाने तेथील पोलिसांवरही झडप घेतली होती. या जमावाला भडकवण्यामागे सिद्धू जबाबदार असल्याची माहिती समोर येत आहे. 

दीप सिद्धू हा भारतीय जनता पक्षाचा निकटवर्तीय मानला जातो. किसान संघ मोर्चाने त्याला सिंघू सीमेवर आंदोलनात सहभागी होण्यास बंदी घातली होती. माजी गँगस्टर लख्खा सिधाना यालाही शेतकरी संघटनांनी कोणत्याही व्यासपीठावर येण्यास मनाई केली होती. मात्र, या दोघांनी खलिस्तानी घटकांशी युती करत आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला. 

खेळाडू, गँगस्टर ते राजकारण; दिल्ली हिंसाचाराप्रकरणी नाव आलेला लक्खा सिधाना आहे कोण?

दीप सिद्धू हा लाल किल्ल्यावर खालसा ध्वज हातात घेऊन घोषणाबाजी करताना दिसून आला. शेतकरी आंदोलनाचा भाग नसतानाही तो या ठिकाणी कसा पोहोचला याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. शेतकरी विरोधी शक्तींना मदत करण्याचं काम तो यावेळी करत होता, असा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांच्या प्रचाराची मदार त्यांने सांभाळली होती. 

लाल किल्ला आणि एकूणच दिल्लीमधील बहुतांश भागात जमाव गेला कसा आणि हा जमाव बराच वेळ लाल किल्ल्यावर हुल्लडबाजी करत असतानाही पोलिसांनी कारवाई का केली नाही? यामुळे दिल्ली पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांची भूमिका संशयास्पद ठरते. तसेच ट्रॅक्टर परेडच्या दिवशी आंदोलनात सहभागी होण्यास दीप सिद्धूला कुणी पाठबळ दिलं? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. 

Tractor Parade: दंगेखोरांकडून लाल किल्ल्याची प्रचंड नासधूस, पाहा फोटो

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप खासदार अभिनेता सनी देओल यांच्यासोबतचा सिद्धूचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सनी देओल यांनी दीप सिद्धूशी संबंध तोडण्याची भाषा केली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी सिद्धू सनी देओलच्या प्रचार पथकाचा एक भाग होता. मात्र, शेतकरी आंदोलनात सामील झाल्यानंतर सनीने सिद्धूशी आमचा काही संबंध नसल्याचे ट्विटरवरून जाहीर केले होते. 

दुसरीकडे किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिल्ली हिंसाचारप्रकरणी गुप्तचर यंत्रणांना जबाबदार धरले आहे. शांततापूर्ण आंदोलन भडकवण्याचा आरोपही त्यांनी दीप सिद्धूवर केला आहे. तर एखाद्या गोष्टीचा निषेध करण्याचा मला हक्क आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावर निशाण साहिब ध्वज फडकवून मी लोकशाहीचा हक्क बजावला. यावेळी जर लोकांचा रोष भडकला असेल तर तुम्ही केवळ एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही. आम्ही लाल किल्ल्यावरील ध्वजस्तंभावरून राष्ट्रध्वज काढलेला नाही, असंही सिद्धूने स्पष्ट केलं आहे.

शेतकरी आंदोलनात फूट; टिकैत यांनी विश्वासघात केला म्हणत एका गटाची माघार​

सुब्रमण्यम स्वामींचं मोठं विधान
लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारामागे पीएमओच्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा मेसेज सोशल मीडियात फिरत आहे. त्यामुळे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, 'या चर्चेत काही तथ्य नाही, ते खोटेही असू शकेल किंवा विरोधकांच्या आयटी सेलने वावड्या उठवल्या असतील, 'पीएमओ'च्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या व्यक्तीने लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून आणला. त्यामुळे नीट तपासून माहिती घ्यावी.'

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top