शिरूरमध्ये थरार : अंदाधूंद गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू तर एकजण जखमी 

नितीन बारवकर
Monday, 18 January 2021

स्वप्निल छगन रणसिंग (वय २५, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे नाव असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे वाळूच्या धंद्यातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आज दुपारी गोळीबाराचा प्रकार घडला. भरदिवसा टाकळीतील एन चौकात घडलेल्या या थरारक घटनेत एकाचा मृत्यू झाला; तर एकजण गंभीर जखमी झाला.

स्वप्निल छगन रणसिंग (वय २५, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे नाव असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी

अनेक गुन्ह्यांत सहभागी असल्याने त्याला तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तडीपारी संपल्याने तो पुन्हा टाकळी हाजी गावात आला होता. दुपारी बाराच्या सुमारास टाकळीतील हॉटेल मळगंगा नजीक तो मित्रांसमवेत गप्पा मारत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्याशी हुज्जत घालून थेट गोळीबार सुरू केला.

आणखी वाचा - पुणे जिल्ह्यातील निकाल वाचा एका क्लिकवर

जीव वाचविण्यासाठी स्वप्निल रणसिंग हा सैरावैरा पळू लागल्यावर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून गोळ्या घातल्या. या थरारक घटनेत त्याला आठ गोळ्या लागल्या. या अंदाधूंद गोळीबारात स्वप्निल सुभाष गावडे (वय २४, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटाला गोळी चाटून गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाळू धंद्यातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून व जून्या आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजवरून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून, काही संशयिंतांचे ठावठिकाणे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी

दरम्यान, या थरारानंतर टाकळी हाजी व परिसरात खळबळ उडाली असून, जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी व परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, कुठलीही अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal killed in shooting in shirur