esakal | पुणेकरांनो आता तरी घरी बसा; बेड, ऑक्सिजन नाही, आयसीयूही उपलब्ध नाही! 
sakal

बोलून बातमी शोधा

critical situation bed oxygen icu not available for covid patients

कोविड केअर सेंटरचीही सुमारे 8 हजार क्षमता आहे. परंतु, दोन्हीकडे सध्या गरजू रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. मुंबईत सुमारे 1 लाख रुग्णांसाठी तेथील महापालिकेने व्यवस्था उभी केली आहे.

पुणेकरांनो आता तरी घरी बसा; बेड, ऑक्सिजन नाही, आयसीयूही उपलब्ध नाही! 

sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे : श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या एका रुग्णासाठी ऑक्सिजन असलेला बेड तातडीने पाहिजे आहे, अशी मदत एका नागरिकाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मागितल्यावर संपूर्ण पुणे शहरात कोठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले. यामुळे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मेडिकल टुरीझमचे शहर, असा लौकीक मिरविणाऱया पुण्यातील आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांना हा सुन्न करणारा अनुभव आला. शहरातील महापालिकेच्या दवाखान्यांत ऑक्सिजन, बेड उपलब्ध आहे, असा दावा करणाऱया महापालिकेच्या कारभाराचा हा एक नमुणा आहे. गरजेच्या वेळी कोठेही बेडची सुविधा नसलेल्या नागरिकांनी जायचे कोठे, असा प्रश्न त्यातून उपस्थित झाला आहे. शहरात रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांचा जीव जात असतानाच्या लागोपाठ घटना घडूनही प्रशासनाने त्यातून अद्याप बोध घेतला नसल्याचेच यातून उघड झाले आहे. त्यामुळे नागरिक आता धास्तावले आहेत. 

शहरात महापालिकेची आणि खासगी रुग्णालयांची मिळून 14 ठिकाणी सुमारे 8 हजार रुग्णांसाठी क्षमता आहे. तर कोविड केअर सेंटरचीही सुमारे 8 हजार क्षमता आहे. परंतु, दोन्हीकडे सध्या गरजू रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. मुंबईत सुमारे 1 लाख रुग्णांसाठी तेथील महापालिकेने व्यवस्था उभी केली आहे. परंतु, चार महिन्यानंतरही महापालिका प्रशासन कोविडसाठी पुरेशी रुग्णालये निर्माण करण्यात सपशेल अयशस्वी ठरली आहे. तसेच कोविड केअर सेंटर्सचीही (विलगीकरण कक्ष) व्यवस्था तोकडी पडत असल्याचे सद्यस्थिती आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 9 हजारांपेक्षा जास्त झाली असली तरी महापालिका यंत्रणा आता अपुरी पडू लागली आहे.

आणखी वाचा - इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, तिघांना अटक 

डॉ. मोरे यांनी नगर रस्त्यावरील त्यांच्या मित्राच्या भावासाठी ऑक्सिजन बेड कोठे उपलब्ध आहे, असे विचारले असता, शहरात कोठेही बेड उपलब्ध नसल्याचे धक्कादायक उत्तर त्यांना देण्यात आले. तुम्ही नाव आणि नंबर देऊन ठेवा, बेड उपलब्ध झाला तर कळविण्यात येईल, असेही त्यांना सांगण्यात आले. डॉ. मोरे यांनी त्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक देऊन ठेवला. मध्यंतरी विश्रांतवाडीतील एका नागरिकाचाही बेड उपलब्ध न झाल्यामुळे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

आणखी वाचा - पुण्याची सूत्रं हाती घेताच नव्या आयुक्तांनी काय केलं?

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोनाचे सध्या 35 हजार 502 रु्गण आहेत. पुणे शहरात सुमारे 9 हजार रुग्ण आहेत. तर, तिन्ही ठिकाणी विलगीकरण कक्षात सुमारे 15 हजार नागरिक आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 हजार 75 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकूण आत्तापर्यंत 1 लाख 98 हजार 487 रुग्णांची तपासणी झाली आहे. तर, 1 लाख 42 हजार 503 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळेच राज्य सरकारने या पूर्वी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, महापालिका आयुक्त शेखर  गायकवाड यांची बदली केली आहे. पुण्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील सुमारे 20 अधिकारी तळ ठोकून आहेत. तरीही 40 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात सक्षम यंत्रणा महापालिकेला खासगी रुग्णालयांच्या मदतीने उभारता आलेली नाही, हे वास्तव आहे.
 

loading image