esakal | शिवचरित्रावरील खेळाचा झेंडा अटकेपार
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

शिवचरित्रावरील खेळाचा झेंडा अटकेपार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास अभ्यासक्रमाच्या चौकटीतून बाहेर काढत खेळाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचविण्याची किमया पुण्यातील दोन युवकांनी साधली आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवर आधारित या ‘मावळा- द बोर्ड गेम’ची दखल केंद्र सरकारनेही घेतली असून, ‘टॉयकेथॉन- २०२१’ या स्पर्धेत निवडून आलेल्या सर्वोत्तम खेळांमध्ये या खेळाचा समावेश केला आहे.

पुण्यातील अनिरुद्ध राजदेरकर, शंतनू कुलकर्णी आणि व्यंकटेश मांडके यांनी नवा व्यापार या खेळाच्या धर्तीवर ‘मावळा- द बोर्ड गेम’ तयार केला आहे. त्यातील कार्डवर महाराज, मावळे, किल्ले, ऐतिहासिक प्रसंगांचा समावेश आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खेळता-खेळता शिवचरित्राची माहितीही यातून होते. एकावेळी तीनजण हा खेळ खेळू शकतात. त्याची रचना कल्पक पद्धतीने केली आहे. त्यामुळेच ‘टॉयकेथॉन’ स्पर्धेत ‘इंडियन कल्चर अँड एथॉस’ या प्रकारात खेळाची निवड झाली. या स्पर्धेसाठी देशातून सुमारे १९ हजार खेळांच्या एंट्री आल्या होत्या. त्यातून १२०० खेळांची अंतिम फेरीत निवड झाली. त्यातून १५० खेळांना विजेते घोषित करण्यात आले. त्यामध्ये ‘मावळा- द बोर्ड गेम’चा समावेश आहे.

हेही वाचा: Breaking! 'सिद्धेश्‍वर'च्या चिमणीची कारवाई अंतिम टप्प्यात!

याबाबत राजदेरकर म्हणाले, ‘‘लॉकडाउनच्या काळात पूर्णवेळ घरी होतो, तेव्हा मुलासोबत विविध सुपर हिरोंचे चित्रपट पाहत होतो. त्यावेळी आपल्या भारतातील सुपर हिरो म्हणजेच शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची माहिती देण्याचे ठरविले. गोष्टींच्‍या माध्यमातून हा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी लक्षात आले, की गणित, विज्ञान या विषयांना प्रात्यक्षिके दाखवून समजवणे शक्य आहे. परंतु, इतिहास या विषयाबाबतीत अशा प्रयत्नांची पोकळी जाणवते. बऱ्याचदा मुलांना इतिहास वाचताना कंटाळा येतो. हा इतिहास रंजक पद्धतीने मुलांना समजावा व त्यांना प्रेरणा मिळावी त्यातून या खेळाची कल्पना सुचली.’’

हेही वाचा: मुंबईत परतीच्या पाऊसाला सुरुवात ?

आज विविध ठिकाणी महाराजांच्या प्रतिमा लावल्या आहेत. लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती कमी होत आहे. त्यामुळे या खेळाच्या माध्यमातून शिवाजी महाराज समजावेत या उद्देशाने तो तयार केला आहे, असे राजदेरकर यांनी सांगितले.

खेळाचे वैशिष्ट्य

- शिवजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या १०१ घटना

- यामध्ये मावळे आणि दुर्ग यांची माहिती देणारे पुस्तक व एक नियमावलीचे पुस्तक

- खेळ खेळताना मुलांना सरदारांच्या शौर्यगाथाही वाचता येणार

- स्वराज्याचा इतिहास खेळाच्या माध्यमातून शिकण्याची संधी

- ऑनलाइन पद्धतीने हा खेळ www.themawala.com यावर उपलब्ध

‘‘हा खेळ मुलांना स्वराज्याचे मावळे बनून खेळायचा असतो. त्यात १० दुर्ग आणि २० मावळ्यांचे कार्ड दिले असून, १०० शिवकालीन होन यांचा समावेश आहे. शिवजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत एकूण १०१ घटनांची माहिती तसेच, त्यांच्या तारखा दिल्या आहेत. त्यामुळे महाराज आणि त्यांचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचविण्याचे हे सर्वांत प्रभावी माध्यम ठरत आहे.

- शंतनू कुलकर्णी

loading image
go to top