चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी असा बसलाय तडाखा

nisarg cyclone
nisarg cyclone

पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्ते बंद झाले असून, वीज पुरवठा खंडित झाला आहे. 

आंबेगाव तालुका
घोडेगाव : 
तालुक्याच्या पश्चिम भागात काल सायंकाळी सहा वाजल्यापासून भिज  पाऊस पडत आहे. त्यामुळे काढणीला आलेली बाजरी व भुईमूग या पिकांना मोठा फटका बसला आहे . आदिवासी भागात या पावसामुळे भात रोपांना संजीवनी मिळणार असून, भाताची रोपे लवकर तयार होतील.  घोडेगाव परिसरातील नारोडी, गिरवली, चास, चिंचोली, कोळवाडी, शिंदेवाडी आदी २० गावात भिजं पावसामुळे काढणीला आलेली बाजरी जमीनदोस्त झाली आहे. 
निरगुडसर : परिसरात हलका पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसान झालेल नाही. मात्र, वारा थोड्या प्रमाणात आहे.

इंदापूर तालुका 
वालचंदनगर :
बोरी परीसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे शंभर एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
वडापुरी : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केली आहे. खरिप हंगामासाठी या पावसाचा फायदा होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, वार्‍याने व पावसाने मका व कडवळ पिके खाली पडले असल्याने नुकसान झाले असल्याचे वडापुरी, काटी, रेडा ,रेडणी अवसरी, बाभूळगाव व परिसरात पहावयास मिळत आहे.
भिगवण : मागील दोन दिवसांमध्ये भिगवण व परिसरामध्ये दमदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा ऊस पिकांना फायदा होणार असून, कोणत्याही नुकसान झालेले नाही.

खेड तालुका
कुरुळी :
परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे. काढणीला आलेले बाजरी,आंबे,मका पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याने भात खाचरे तुडुंब झाली आहेत. रोपे टाकण्याची कामे यामुळे थांबली आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी वाळलेल्या कडबा, सरमाड, मक्याचे अचानक आलेल्या पावसाने भिजून नुकसान झाले आहे. शेताच्या बांधावरील झाडे वेगवान वाऱ्याच्या प्रवाहाने जमिनीवर पडली आहेत. परिसरात भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.
चास : परिसरात रात्रीपासून सोसाट्याचा वारा सुरू असून, अधूनमधून दमदारपणे पाऊस कोसळत होता. वाऱ्याचा वेग जरी जास्त असला, तरी कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही. कालपासून आज सकाळी 11 वाजेपर्यंत 40 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली असून, ओढ्यानाल्यांना थोड्याफार प्रमाणात पूर आला होता. उन्हाळी हंगामातील बाजरीची पिके, कोथींबीर व मेथीच्या पिकाचे थोडयाफार प्रमाणात पावसाच्या ताडाख्याने नुकसान झाले असून, आंब्याच्या झाडांवरील फळांची गळ झाली आहे. वादळाच्या भीतीने नागरिक घरांमध्ये आहे.
कडूस : परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्रभर सुरू असलेल्या दमदार पावसाने उन्हाळी बाजरी, भुईमूग पिकासह शेतात अरण लावून साठून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेगवान वाऱ्यामुळे नुकसान होण्याच्या धास्तीने पोल्ट्रीशेड, पॉलिहाऊस शेडनेट मालकांनी जीव मुठीत धरून रात्र जागून काढली.
पाईट : पाळू गावातील पांडुरंग नारायण गायकवाड यांच्या घराचे वादळी  वाऱ्यामुळे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तसेच, त्यांच्या घराचे छपर उडून शेजारच्या घरावरती पडल्यामुळे शेजारच्या कौलारू घराचे देखील नुकसान झाले आहे.                                  आंबेठाण : चाकण एमआयडीसीसह तालुक्याच्या पश्चिम भागात वासुली फाटा, करंजविहिरे परिसरात काल सायंकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली होती. आज देखील सकाळपासून वाऱ्याचा फारसा जोर नसला तरी पाऊस बरसत आहे. काल सायंकाळी काही ठिकाणी लोखंडी पत्रे उडाले होते.

शिरूर तालुका
कोरेगाव भीमा :
शिरूरच्या पश्चिम पट्ट्यासह पूर्वहवेलीत आज जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु झाला असून, काही ठिकाणी काही पिकांसह लहान झाडांचे किरकोळ नुकसान झाले.
गुनाट : तालुक्याच्या पूर्व भागातील गुनाट, करडे, निमोणे, मोटेवाडी,  चव्हाणवाडी, शिंदोडी या गावात काल सायंकाळी सहानंतर  जोरदार हजेरी लावली. नुकत्याच येऊन गेलेल्या चासकमानच्या आवर्तनात या गावातील शेतकर्‍यांना पुरेसे पाणी मिळाले नाही. या पावसाने पिकांना जीवदान मिळाल्याने  'चासकमाने मारले, पावसाने तारले'! अशाच प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी दिल्या. शेतातच कांदा पडुन असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची धांदल उडाली.  

हवेली तालुका
लोणी काळभोर :
उरुळी कांचन, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत मंगळवारी (ता. 2) सायंकाळी चार वाजल्यापासून सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल झाला आहे. पूर्व हवेलीमधील इतर गावांच्या तुलनेत लोणी काळभोर व आळंदी म्हातोबाची या दोन गावात मागिल सोळा तासात मोठा पाऊस झाला आहे. येथे मंगळवारी सायंकाळी चारपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. पाऊस होण्यापूर्वी वारे मोठ्या प्रमाणात वारे सुरु झाल्याने काही ठिकाणी झाडेही पडली. वादळामुळे विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा बुधवारी दुपारी बारापर्यंत खंडित झाला होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. 
खेड शिवापूर : खेड शिवापूर परीसरात बुधवारी दिवसभर वारे आणि पावसाची संततधार सुरू होती. वाऱ्यामुळे अनेक गावात गावरान आंबा पिकांचे झालेले नुकसान वगळता या परिसरात इतर कोणतीही नुकसानीची घटना घडली नाही. बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत मध्यम स्वरूपाचा संतधार पाऊस सुरू होता. पाऊस आणि वारा यामुळे सावधानता बाळगून नागरीकांनी घराबाहेर पडणे टाळले.सततच्या पावसामुळे शेतात तसेच पुणे-सातारा रस्त्यावरील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.

वेल्हे तालुका
वेल्हे : 
वेल्हे तालुक्यात वाऱ्याचा वेग वाढत असून, तालुक्यात ठिकठिकाणी यंत्रणा सज्ज केली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती 
तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.

जुन्नर तालुका
जुन्नर :
जुन्नर तालुक्यात रात्रीपासून सर्वत्र पाऊस होत असून, वारा देखील वाहत आहे. गेले दोन दिवस आकाश ढगाळलेले असून सूर्यदर्शन झाले नाही. तालुक्यातील नऊ मंडल विभागातील पर्जन्य मापन केंद्रावर एकूण १२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वारे पूर्वेकडून पश्चिमेला वाहत असल्याचे दिसत आहे.  पश्चिम आदिवासी भागात वाऱ्याचा जोर अधिक असल्याचे सांगण्यात आले.                                    आळेफाटा : परिसरात काल मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी येत होत्या. आज सकाळपासून काही प्रमाणात वारे वाहत असून, पावसाची उघडझाप सुरु आहे. परिसरातील वडगाव आनंद, आळेफाटा, आळे, राजुरी, बेल्हे, आणे, साकोरी पट्ट्यात वातावरणात गारवा असून, पावसाळी वातावरण आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे कांदा भिजू नये म्हणून शेतकरी वर्गाची लगबग सुरु आहे.

भोर तालुका
भोर :
भोर तालुक्यात चक्रीवादळाचा तडाका बसण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी सकाळी काही ठिकाणी झाडे पडली. मंगळवारी रात्रभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. बुधवारी सकाळनंतर पावसाचा जोरही वाढला. सकाळी दहाच्या सुमारास भाटघर धरणाजवळ महावितरणच्या लाईनवर झाड पडल्यामुळे भोर शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी तुटलेल्या तारा जोडण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत. आंबवडे  व हिरडोशी खोऱ्यात काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सुदैवाने कोणतीही मोठी वित्त आणि किंवा जीवित हानी झालेली नाही.  
नसरापूर : नसरापूर व परिसरात काल संध्याकाळपासूनच पावसाची सुरवात झाली. आज सकाळपासून या पावसाला वादळी वाऱ्याची जोड मिळाली असून, अनेक ठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडणे, अशा घटना घडल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही गंभीर घटना नाही. नसरापूर बाजारपेठत शुकशुकाट होता. परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी देखिल शेतातील कामे थांबवून घरी राहणेच पसंत केले होते.

पुरंदर तालुका                                          सासवड : पुरंदर तालुक्यातील खरीप हंगाम तयारीची कामे सलग पावसाने बंद पडली आहेत.  वाऱ्यासह पावसाने झाडे पडणे, फांद्या तुटून पडणे, पावसाने रस्ते खराब होणे, खांबावरील तारा, वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढलेत. १ मे ते १ जूनअखेर एकूण पाऊस १३६.७ मि.मी पडला. तर पुढील दोन दिवसात मिळून आजअखेर महिन्याचा मान्सूनपूर्व पाऊस 167.9 मि.मी.

माळशिरस : माळशिरस परिसरात काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस येत आहे. आज सकाळपासून या भागात जोरात वारे वाहत असून, संततधार पाऊसही आहे. पाऊस पेरणी योग्य झाल्याने शेतकरी सुखावला असला, तरी या जोराच्या वारयाने जनावरांच्या चारयासाठीचे कडवळ, मका ही चारा पिके भुईसपाट झाली आहे. तसेच, सिताफळ, डाळिंब, पेरू या फळपिकांना फटका बसला. या फळभागांचे फळ व फुल गळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
वाल्हे : परिसरात काल सायंकाळी कमीजास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाने 
सखल भागामध्ये बहुतांश ठिकाणी तळ्यांचे स्वरूप झाल्याचे पहावास मिळत आहे. येथील पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाला वीर- मांडकी- पिंगोरी आदी गावांचा जोडणाऱा रस्ता दयनीय झाला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com