esakal | बारामतीत दहीहंडी नाही; गणेशोत्सवातील फेस्टीव्हलही रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Dahihandi and Ganeshotsav festival also canceled in Baramati

दरम्यान यंदा बारामतीत कोणत्याही मंडळाला रस्त्यावर गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. आज बारामती शहर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत सर्वच प्रमुख मंडळांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास मान्यता दिल्याचे पाटील यांनी नमूद केले. ​

बारामतीत दहीहंडी नाही; गणेशोत्सवातील फेस्टीव्हलही रद्द

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारामतीत गणेशोत्सवात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संबंधित मंडळांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान यंदा बारामतीत कोणत्याही मंडळाला रस्त्यावर गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. आज बारामती शहर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत सर्वच प्रमुख मंडळांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास मान्यता दिल्याचे पाटील यांनी नमूद केले. 

बारामती गणेश फेस्टीव्हल यंदा रद्द करण्यात आल्याची घोषणा किरण गुजर यांनी समाजमाध्यमावरुन केली आहे. दरम्यान कसब्यातील श्री काशिविश्वेश्वर मंडळाचा फेस्टीव्हल यंदा होणार नसल्याचे सचिन सातव यांनी सांगितले. तसेच अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचा श्रीमंत आबा गणेशोत्सव फेस्टीव्हल देखील यंदा होणार नसल्याचे स्वप्निल भागवत यांनी नमूद केले. 

प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण...
 

दरवर्षी गणेशोत्सवामध्ये या तिन्ही फेस्टीव्हलच्या माध्यमातून दहा दिवस बारामतीकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी असते. तिन्ही फेस्टीव्हलला लोकांचा मोठा प्रतिसाद असतो. गणेशोत्सवाच्या काळात मनोरंजन व्हावे या उद्देशाने या फेस्टीव्हलचा प्रारंभ केला गेला होता. 

यंदा कोरोनामुळे गर्दी होऊ नये याची प्रशासन काळजी घेत असल्याने सर्वच प्रमुखांनी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच गणेशोत्सव मंडळांनी या बाबत सामाजिक भान राखून गर्दी होईल, असे कोणतेच उपक्रम न करण्याचे ठरविले आहे, त्या मुळे यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट स्पष्टपणे जाणवते आहे. 

यंदा दहीहंडीही नाही....
बारामतीचे आणि दहीहंडीचे अतूट नाते. दरवर्षी बारामतीत किमान लहान मोठी मिळून 35 मंडळे दहीहंडी उभारतात. गोविंदाचा उत्साह वेगळाच असतो. संपूर्ण बारामती शहरच दहीहंडी पाहण्यासाठी रस्त्यावर येते. यंदा गर्दीच टाळायची असल्याने कोणीही दहीहंडी आयोजित करणार नाही. इतकेच नाही तर बारामतीतून डझनभर दहीहंडी संघ आपापल्या गोविंदांसह जेजुरी, सासवड, हडपसर, पुणे शहरासह अनेक ठिकाणच्या दहीहंडी दरवर्षी फोडतात. यंदा कोरोनाच्या संकटामुळे सगळेच ठप्प झाले असल्याने गोविंदाही हिरमुसले आहेत. 

स्पेशल पोलिस ऑफिसरची नियुक्ती होणार...
शहरातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळातील प्रत्येकी पाच कार्यकर्त्यांना स्पेशल पोलिस ऑफिसर (एसपीओ) ची मान्यता काही काळापुरती देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे हा प्रस्ताव पाठवून जिल्हाधिकारी या एसपीओंना काही अधिकार प्रदान करतील. विनामास्क फिरणारे किंवा एकाच दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणा-यांवर जिल्हाधिका-यांनी अधिकार प्रदान केल्यानंतर  हे एसपीओ कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करु शकतील. स्थानिक प्रशासनाला याची मदत होणार आहे. औदुंबर पाटील यांनी प्रत्येक मंडळाकडून अशी पाच नावे देण्यास सांगितले आहे. 

पुणेकरांनो, यंदा बाप्पा येणार तुमच्या दारी !