महामार्गावरील तीव्र उतारच ठरतोय कर्दनकाळ

पांडुरंग सरोदे/विठ्ठल तांबे
Wednesday, 13 January 2021

कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल बाह्यवळणावरील अपघातांच्या मालिकेत अनेकांचे बळी जात असतानाही हा मार्ग सुरक्षित व्हावा, यासाठी उपाययोजनांची केवळ चर्चा केली जातेय.  येथील अपघात हे तीव्र उतारामुळे होत असल्याचे वारंवार निदर्शनास येऊनही ‘उतार कमी करता येणार नाही; परंतु इतर कामे बुधवारपासून सुरू होतील’ असे उत्तर जबाबदार यंत्रणेकडून देण्यात आले.

पुणे/धायरी - कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल बाह्यवळणावरील अपघातांच्या मालिकेत अनेकांचे बळी जात असतानाही हा मार्ग सुरक्षित व्हावा, यासाठी उपाययोजनांची केवळ चर्चा केली जातेय.  येथील अपघात हे तीव्र उतारामुळे होत असल्याचे वारंवार निदर्शनास येऊनही ‘उतार कमी करता येणार नाही; परंतु इतर कामे बुधवारपासून सुरू होतील’ असे उत्तर जबाबदार यंत्रणेकडून देण्यात आले.  

या भागात सोमवारी झालेल्या सहा अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. या घटनेनंतरही रस्ता सुरक्षिततेचे धोरण पुढे सरकले नाही. म्हणूनच, हे ठिकाण ‘डेथ झोन’ ठरत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल बाह्यवळण परिसरात गंभीर अपघातांच्या सहा घटना घडल्या. या अपघातांत सख्या भावांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर ११ महिन्यांच्या बाळासह दांपत्य व अन्य सहा जण जखमी झाले. २०२० या वर्षात या ठिकाणी ३९ अपघात झाले. त्यामध्ये २० जणांना प्राणास मुकावे लागले. हे सगळे घडतेय, ते महामार्गावरील अवघ्या चार किलोमीटरच्या परिसरामध्ये.

पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम

अधिकारी-लोकप्रतिनिधी उदासीन
महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या भागात २००० सालानंतर झपाट्याने नागरिकरण वाढले. त्यामुळे पूर्वी शहराबाहेर असणारा महामार्ग आता शहराचाच एक भाग झाला आहे. विशेषतः दररोज नोकरी, व्यवसाय व कामानिमित्त जाणाऱ्यांकडून याच मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो. दक्षिणेकडील अनेक राज्यांतील अवजड वाहने पुणे, मुंबईसह मोठ्या शहरात व तेथून अन्य राज्यात जातात. मात्र कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत महामार्गावर तीव्र उतार आहे. उतारामुळे मोठ्या वाहनांचा वेग वाढतो. वेग वाढल्याने अवजड वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडतात. तथापि, वारंवार अपघात घडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी अपघात ठिकाणांची पाहणी करतात. मात्र त्यानंतर कार्यवाही होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

‘बीडीपी’तील बांधकामे धोक्यात; हरित लवादाने मागविला कारवाईचा अहवाल  

दुभाजक फोडले
सेवा रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्या, दुकाने, पार्किंग तसेच मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी दुभाजक फोडून ये-जा (पंक्‍चर) केली जात असल्याने अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने येतात. महामार्गालगत सात मीटर सेवा रस्ते मंजूर असूनही प्रत्यक्षात ते अर्धवट आहेत, त्यामुळेही अपघात होतात.

हिंडतो त्यांच्याबरोबर मत तुम्हालाच....!

या उपाययोजना आवश्‍यक

 • तीव्र उतार कमी करणे
 • महामार्गाच्या दुतर्फा 
 • सलग सेवा रस्ते उभारणे 
 • दिशादर्शक, रम्बलर्स, ब्रायफ्रेन रोप, 
 • दुभाजकांचा वापर
 • सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांच्या नियमांची अंमलबजावणी
 • वेगावर नियंत्रण आणून पोलिसांची गस्त वाढविणे
 • मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत सूचना फलक लावणे

कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल दरम्यान गेल्या वर्षी झालेले अपघात

 • अपघात        - ३९
 • मृत्यू          - २०
 • जखमी        - ३४ 
 • नुकसानग्रस्त वाहने - ५० 
 • मोठे अपघात       - १५
 • यातील मृत्यू   -१८
 • ब्लॅक स्पॉट  - ७

महामार्गावर दिशादर्शक फलक, रोड स्टड लावणे, कर्व्ह पेंटिंग करणे तसेच वाहतूक नियमन करणारी यंत्रणा वाढविण्यात येणार आहे. उतार कमी करण्याचे कुठलेही काम करण्यात येणार नाही. बुधवारपासून वरील काम सुरू होईल.
- सुहास चिटणीस, मुख्य प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

वाहतूक विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान असलेल्या महामार्गाची पाहणी केली. त्यासंबंधीच्या तसेच उपाययोजना व धोकादायक पंक्‍चर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

आम्ही वाहन विकत घेतो, तेव्हा रोड टॅक्‍स भरतो. त्यामुळे चांगले रस्ते असणे हा आमचा अधिकार आहे. असे असतानाही खराब रस्ते व तांत्रिक चुकांमुळे या रस्त्यावर अपघात होत आहेत. आम्ही स्थानिक असूनही आम्हाला कुटुंबासमवेत या रस्त्यावरून जाताना भीती वाटते.
- रोहिदास जोरी, रहिवासी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous steep descent on the highway Katraj tunnel to navale bridge