esakal | दौंड: भीमा पाटस’च्या खासगीकरणाचा डाव
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड: भीमा पाटस’च्या खासगीकरणाचा डाव

दौंड: भीमा पाटस’च्या खासगीकरणाचा डाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दौंड : ‘‘दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी चाळीस वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संगनमताने खासगीकरण करण्याचा डाव आहे. तालुक्यात सहकार मोडीत काढून खासगीकरणाच्या माध्यमातून लूट करण्याचे मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे,’’ असा गंभीर आरोप भाजपचे नेते तथा कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी केला.

हेही वाचा: बजाजच्या लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार

दौंड शहरात शुक्रवारी (ता. ३) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ताकवणे यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम हे उपस्थित होते. या वेळी ताकवणे म्हणाले, ‘‘भीमा साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा बॅंकेचे चेअरमन तथा माजी आमदार रमेश थोरात हे बंद कारखान्याच्या कारभाराविषयी तक्रार न करता फक्त चौकशीची मागणी करून नूरा कुस्ती खेळत आहेत.

दोघेही चौकशीची मागणी करतात, परंतु प्रत्यक्षात कोठेही तक्रार करून दाद मागत नाहीत. दोघांमध्ये अंडरस्टॅंडिंग असून, कारखान्याबाबत सभासदांची फसवणूक करत आहेत. जिल्हा बॅंकेने कारखान्याविरुद्ध दीडशे कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीप्रकरणी दिरंगाई का केली आणि कारखान्यावर जप्तीची वेळ कोणी आणली, हे स्पष्ट झाले पाहिजे. जप्तीची कारवाई संशयास्पद आहे.’’

हेही वाचा: Image Gallery: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात, नागरिकांची त्रेधातिरपट!

‘‘दौंड तालुक्यात ४० लाख टन उसाचे क्षेत्र आहे. तीन खासगी साखर कारखाने आणि साडेपाचशे गुऱ्हाळे सुरू असताना ऊस शिल्लक राहत आहे. भीमा सहकारी साखर कारखाना उसाअभावी बंद पडलेला नसून, आर्थिक डबघाईमुळे बंद पडला आहे. या डबघाईला नेमकं जबाबदार कोण, हे चौकशीतून एकदा स्पष्ट झालेच पाहिजे. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा बंद कारखाना सुरू होणे गरजेचे आहे,’’ असे मत ताकवणे यांनी व्यक्त केले.

‘दोषी दिवाळीला कारागृहात जातील’

‘‘भाजपचे आमदार राहुल कुल हे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून जर दोषी असतील, तर त्यांनी शिक्षा भोगायची तयारी ठेवावी. भाजपचे आमदार असले तरी पक्षाचा भ्रष्टाचाराला पाठिंबा नाही. सखोल चौकशीनंतर कदाचित राहुल कुल आणि रमेश थोरात हे दोघेही दोषी नसतील. परंतु, कारखान्याच्या भ्रष्ट कारभारासाठी जे दोषी असतील, ते येत्या दिवाळीला मात्र कारागृहात जातील,’’ असा दावा नामदेव ताकवणे यांनी केला.

loading image
go to top