मित्राच्या बर्थडे पार्टीत झिंगाट झालेले थेट पोचले...

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 23 मे 2020

मित्र अठरा वर्षांचा झाल्याने पाच जणांनी जोरात बर्थ डे पार्टी केली. मात्र, त्यानंतर दारूच्या नशेत त्यांना वाहनातून जाताना वेगाचे भान राहिले नाही.

दौंड (पुणे) : मित्र अठरा वर्षांचा झाल्याने पाच जणांनी जोरात बर्थ डे पार्टी केली. मात्र, त्यानंतर दारूच्या नशेत त्यांना वाहनातून जाताना वेगाचे भान राहिले नाही. त्यामुळे दौंड पोलिसांना एक तास पाठलाग करून त्यांच्यातील दोघांना पकडले.

मुलीकडून प्रेमाचे नाटक, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल  

अठराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दौंड शहरातील अॅनम अमित अमोलिक या युवकाच्या बर्थ डे पार्टीसाठी त्याचे मित्र जमले होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी हे कुरकुंभ- गिरीम रस्त्यावर मध्यरात्री गस्त घालत होते. त्यादरम्यान कुरकुंभ एमआयडीसीमध्ये शनिवारी पहाटे अडीच वाजता एम. एच. ४२, के ७७४९ या वाहनाचा चालक भरधाव व वेडेवाकडे पध्दतीने वाहन चालवत असल्याने त्यांनी त्यास थांबण्यास सांगितले. परंतु, चालक न थांबता वाहनाचा वेग वाढवून निघून गेला. याबाबत पोलिसांनी दौंड शहर व पाटस रस्त्यावर गस्त घालणाऱ्या गस्त पथकातील अन्य पोलिसांना याची माहिती देऊन वाहन अडविण्याच्या सूचना केल्या. 

बाप रे...बंधाऱ्यावरून नदीत कोसळला ट्रक, त्यात होते...  

दरम्यान, वाहनचालकाने गिरीम येथून वायरलेस फाट्याकडे न जाता गोपाळवाडी मार्गे दौंड शहरात प्रवेश केला.शहरात आल्यानंतर हमरस्त्याने न जाता पाठलाग चुकविण्यासाठी अरूंद अशा अंतर्गत रस्त्यांवरून भरधाव वाहन नेले. परंतु, पोलिस नाईक रणसिंग व बापू रोटे यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना डिफेन्स काॅलनी येथे गाठले. अॅनम अमित अमोलिक (वय १८, रा. डिफेन्स कॅालनी, दौंड) व श्रीनिवास राजू अय्यर (वय २१, रा. गुलमोहर अपार्टमेंट, दौंड) या दोघांना पकडण्यात आले. तर ओंकार नितीन भालेकर (वय २१, रा. जनता कॅालनी), प्रितेश प्रदीप पग्गी (वय २१) व लॅारेन्स रॅाबर्टसन (वय २१, दोघे रा. बंगला साइड, दौंड) हे आरडाओरडा करून पळून गेले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी या पाच जणांविरूध्द भारतीय दंड विधान, मोटार वाहन कायदा, मुंबई पोलिस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हवालदार महेश भोसले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार तन्वीर सय्यद यांनी दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daund- Police crack down on drunkards at a friend's birthday party