सिंहगड रस्त्यासाठी ‘डेडलाइन’ निश्‍चित

अनिल सावळे
Thursday, 21 January 2021

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी ते सिंहगड पायथ्यापर्यंत रखडलेल्या कामांबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून मांडलेल्या प्रश्‍नांची सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी लागली. कोणत्याही परिस्थितीत येत्या ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.

पुणे - सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी ते सिंहगड पायथ्यापर्यंत रखडलेल्या कामांबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून मांडलेल्या प्रश्‍नांची सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी लागली. कोणत्याही परिस्थितीत येत्या ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच, या रस्त्यावर अपघाताला कारणीभूत ठरणारी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीपासून डोणजे-सिंहगड पायथा, खानापूर आणि पाबे गावापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाच्या २१० कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अजूनही निम्म्यापेक्षा अधिक काम रखडले आहे. त्यातच संथगतीने काम सुरू असल्याने अपघात आणि वाहतूक कोंडीही होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात ‘सकाळ’शी बोलताना चव्हाण यांनी रस्त्याचे काम रखडल्याचे मान्य केले. रस्त्यातील विजेचे खांब आणि झाडे काढण्याच्या कामाला विलंब झाला. तसेच, कोरोनामुळे कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. परंतु ही कामे गतीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण करण्यावर विशेष लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खंडणी मागत व्यावसायिकांना केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

‘नांदेड सिटी ते पाबेपर्यंत रस्त्याचे काम सलग करून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. याबाबत आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी कंत्राटदारास सूचना दिल्या आहेत. कामाच्या गुणवत्तेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे,’ असे कार्यकारी अभियंता (उत्तर विभाग) बाप्पा बहिर यांनी सांगितले.

Video: अयोध्येतील राममंदिरासाठी राज्यपालांचं दगडूशेठ गणपतीला साकडं!

कामाबाबत पारदर्शकता हवी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३१ मेपर्यंत काम करण्यासाठी पुरेसा निधी आहे का? कंत्राटदारास हे काम पूर्ण करण्यासाठी किती कालमर्यादा दिली आहे? कामाचा दर्जा तपासणारी यंत्रणा किती सक्षमपणे काम करीत आहे? कोणती कामे कधी सुरू आणि पूर्ण होणार, याबाबत नागरिकांना माहिती मिळणे अपेक्षित आहे. कामात पारदर्शकता आणण्यासाठी ही संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. कामास विलंब झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी. एखाद्या ठिकाणी काम सुरू होणार असल्यास त्याची पूर्वसूचना नागरिकांना दिली पाहिजे; जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल, असे मत ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर यांनी व्यक्‍त केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline fixed for Sinhgad road