
वेल्हे - किल्ले राजगडावर (ता. वेल्हे) मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात दरीत पडून युवकाचा मृत्यू झाला. सुजय भगवान मांडवकर (वय २०, रा. बोरघर जाधववाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेची माहिती प्रतीक प्रकाश चव्हाण (जि. रत्नागिरी) यांनी पोलिसांना दिली. प्रतीक यांच्यासह दहा ते बारा जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी रविवारी (ता. २९) राजगडावर गेला होता. किल्ल्यावर फिरत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास सुवेळा माचीजवळ असलेल्या मधमाश्यांच्या पोळाला काही पर्यटकांनी डिवचल्यामुळे मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला चढविला. यामध्ये अनेक जण स्वतःचे रक्षण करण्यासाठी सैरावैरा पळत सुरक्षित ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करत होते. काही कालावधीनंतर ग्रुपमधील सदस्य एकत्र जमल्यानंतर ग्रुपमधील सुजय दिसला नाही. त्यामुळे सर्वांनी त्याचा किल्ल्यावर सर्वत्र शोध घेतला.
दरम्यान, रात्री किल्ल्यावर अंधार पडल्यानंतर शोध मोहिमेत अडथळा आला. ग्रुपमधील सदस्यांनी शंभर नंबरवर घटनेची माहिती दिली. त्यानंतर वेल्हे पोलिस व स्थानिक नागरिक, भोर येथील सह्याद्री रेस्क्यु टीमच्या मदतीने किल्लावर शोध घेण्यात आला. सुवेळा माचीच्या मळे गावच्या बाजूकडील सुमारे आठशे फूट खोल दरीत सुजय पडल्याचे निदर्शनास आले. डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वेल्हे पोलिसांनी सांगितले.
राजगडच्या दरी कपारीतून रात्रीच्या अंधारात वेल्हे पोलिस औदुंबर अडवाल, अभय बर्गे, होमगार्ड विक्रांत गायकवाड, प्रवीण भरम, स्वप्नील शिंदे, करण मिंडे, पोलिस मित्र योगेश दरडिगे, शंकर शिर्के, बाळू जाधव, सुभाष दळवी, अक्षय दरडिगे, लक्ष्मण ढेबे, संतोष शिंदे व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह किल्ल्यावरून खाली आणला. पंचनामा केल्यांनतर आज (ता. ३०) सुजयचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.