esakal | "रात्र' जागविणाऱ्यांना "दिवस' आले वाईट 
sakal

बोलून बातमी शोधा

tamasha

कोरोनामुळे फक्त आरोग्याचेच प्रश्‍न निर्माण झाले नाहीत, तर अनेक आर्थिक आणि सामाजिक प्रश्‍नही पुढे आले आहेत. सध्या "दोन घासाची व्यवस्था कशी करावी' या विवंचनेत अनेक जण आहेत. त्यातीलच एक घटक म्हणजे लावणी व तमाशा कलावंत. 

"रात्र' जागविणाऱ्यांना "दिवस' आले वाईट 

sakal_logo
By
गणाधीश रा. प्रभुदेसाई

पुणे : कोरोनामुळे फक्त आरोग्याचेच प्रश्‍न निर्माण झाले नाहीत, तर अनेक आर्थिक आणि सामाजिक प्रश्‍नही पुढे आले आहेत. सध्या "दोन घासाची व्यवस्था कशी करावी' या विवंचनेत अनेक जण आहेत. त्यातीलच एक घटक म्हणजे लावणी व तमाशा कलावंत. 

लॉकडाउनमुळे यंदा यात्रा- उत्सव रद्द झाले. साहजिकच मनोरंजनाचे कार्यक्रमही रद्द करावे लागले. एका यात्रा हंगामात वर्षभराचा पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविणाऱ्या लावणी व तमाशा कलावंतांना सध्या प्रत्येक दिवस कसा घालवायचा, याचा विचार करावा लागत आहेत. कमाईचा पूर्ण हंगामच हातातून निसटलेला आहे. त्यामुळे सध्याचे दिवस कसे ढकलायचे याचे कोडे सोडवितानाच पुढील वर्षभराचे गणित आणखी अवघड झाले आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील लोककलावंतांना सरकारी पातळीवर किंवा खासगी स्वरुपात मदत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कला केंद्रात जाऊन आपल्या श्रीमंतीचे दर्शन घडविणाऱ्यांनी अशा काळात काही मदत केली तर योग्य झाले असते, असे अपेक्षा काही कलावंतांनी व्यक्त केली. 

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

यासंबंधी महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव म्हणाले, ""हवे ते नियम, अटी घालून सरकारने कला केंद्रे सुरू करण्याची परवानगी द्यावी. थिएटर मालक सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहेत. पूर्वी इतके लोक संगीत बारीसाठी आले नाही, तरी कलाकारांना थोडाफार आर्थिक हातभार लागेल. कलाकारांचीही संपूर्ण जबाबदारी मालक घेणार आहेत. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची, आजारी पडल्यास औषधांची काळजी तरी दूर होईल.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घरकामाला, नको गं बाई... 
लॉकडाउनच्या काळात काही महिला कलाकारांनी घरकाम करून पोट भरण्याचा प्रयत्न केला. पण काम मागण्यासाठी गेल्यानंतर, पूर्वी कोठे काम करत होता, या प्रश्‍नावर, तमाशा फडात किंवा कला केंद्रात असे सांगितले की, "नको नको, आमच्याकडे कामाला बाई येते किंवा कामाला बाई नको,' असे सांगितले जाते. 

शिष्टमंडळ भेटणार नेत्यांना 
महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेची बैठक 2 ऑगस्टला चौफुला (ता. दौंड) येथे न्यू अंबिका कला केंद्रात झाली. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव व त्यांच्या पत्नी जयश्री यांनी यासाठी पुढाकार घेतला. राज्यभरातील कला केंद्रांचे मालक उपस्थित होते. कला केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संघटनेचे शिष्टमंडळ आठवडाभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतील व आपल्या समस्या मांडतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

अशी आहे संख्या 
राज्यात कला केंद्रे- सुमारे 65 ते 70 
कलावंत- सुमारे 6 ते 7 हजार (यात नृत्य, वादन, गायन व संयोजकांचा समावेश) 
मोठे तमाशा फड- 13 
लहान फड- सुमारे 150 
यातील कलावंतांची संख्या- सुमारे साडेदहा ते 11 हजार 

अशी आहे परिस्थिती 
- हजारो लावणी कलावंत लॉकडाउनमुळे घरी 
- शेतात मजुरी करण्याची वेळ 
- भाजीविक्रीचाही घेतला आधार 
- परप्रांतीय गावी गेल्याने काहींनी कंपन्यांमध्ये केले काम 
- काही पुरुष कलाकारांनी रिक्षा चालविली 

तीन नर्तिका, एक गायिका, हार्मोनिअम व ढोलकी वादक असे सहा जण घेऊनच संगीत बारी करू. कलाकारांची व कला केंद्रात येणाऱ्यांचीही काळजी घेऊ. साडेचार महिने सर्वांनी स्वतःची काळजी घेतली आहे. पुढेही घेऊ. कला केंद्रांना परवानगी द्यावी. लोक येतील असा विश्‍वास आहे. लोककलावंतांनाही तेवढाच आधार मिळेल. 
- डॉ. अशोक जाधव, 
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर चालक मालक संघटना