मंत्री धनंजय मुंडे व ग्रामपंचायत निकालांबाबत अजित पवार म्हणतात...

कल्याण पाचांगणे
Monday, 18 January 2021

पवार यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्थेत कृषी तंत्रज्ञान सप्ताहच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

माळेगाव : महाविकास आघाडीचे सरकारमधील पक्षांना राज्यात ग्रामपंचायत पातळीवर चांगले यश मिळाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेले कृषी मंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, दत्तात्रेय भरणे, विश्वजित कदम, आमदार रोहीत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ग्रामपंचायतीच्या निकालाबाबत आम्ही समाधानी आहोत. कर्जत-जामखेडमध्ये तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावची ग्रामपंचायत पुर्णतः त्यांच्या विरोधात गेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात दिली.

आणखी वाचा - पुणे जिल्ह्यातील निकाल वाचा एका क्लिकवर

यावेळी पवार यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्थेत कृषी तंत्रज्ञान सप्ताहच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपावर पवार यांनी सावध भूमिका मांडली. ते म्हणाले, ''मंत्री मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे जरी गंभीर असले तरी ज्या महिलेने ते आरोप केलेले आहेत, त्याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत. वास्तविक भाजप, मनसेचे एक नेते, तसेच एका अधिकाऱ्यानेही संबंधित महिलेविरुद्ध विविध आरोप केले. हे सगळे चित्र पाहता संबंधित प्रकरणाची पोलिस चौकशी झाल्यानंतरच वरील प्रकरणी स्वतः पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील.''  

आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का? असे विचारले असता पवार म्हणाले, ''देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून न घेता केवळ चर्चांच्या फेऱ्या घेवून केंद्र सरकार वेळकाढूपणा करीत आहे. वास्तविक दिल्लीतील नेतेमंडळींनी चर्चा न करता आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दुर्दैव एवढेच आहे, की शेतकऱ्यांच्याबद्दल केंद्राला आत्मीयता नाही. शेतकऱ्यांचा आपमान होत आहे, या घटनेचा मी निषेध करतो.'' 

आणखी वाचा - हवेली तालुक्यातील निकाल

पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काॅग्रेस पक्षाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सदरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी केवळ मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकरी विरोधी कायद्याबाबत आंदोलने केली जातील. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy chief minister ajit pawar criticizes bjp